मराठी हिंदी सिनेजगतात अनिल-अरुण या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही कायम आहे. भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा सगळ्या दालनात मुशाफिरी करणा-या अनिल मोहिले आणि अरुण पौंडवाल या संगीतकार जोडीला ‘रुपेरी वाळूत’ या सांगीतिक कार्यक्रमातून मानवंदना देण्यात येणार असून, त्यांच्या गीतांचा स्वरगंध पुन्हा दरवळणार आहे.
ठाण्यातील काशिनाथ सभागृहात २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता, ३० ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात तर पुण्यात टिळक स्मारकामध्ये ११ साप्तेम्बारला रात्री ९.३० वाजता या संगीत रजनीचे कार्यक्रम निश्चित झाले आहेत.
अनुराधा पौडवाल यांनी या सांगीतिक कार्यक्रमाची निर्मिती केली असून, त्यांची दोन मुलं आदित्य पौडवाल व कविता पौडवाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येणार आहेत. संगीत क्षेत्रातले हे दोन युवा गुणवंत चेहरे ‘रुपेरी वाळूत’ या कार्यक्रमातून अनिल-अरुण यांची गीते आजच्या पिढीपर्यंत पोहचवणार आहेत.
आदित्य पौडवाल, कविता पौडवाल व चंद्रशेखर महामुनी या सुमधुर गीतांचा नजराणा सादर करतील. तसेच कलाकारांच्या कथनातून अनिल-अरुण यांच्या सांगीतिक आठवणीना उजाळा देण्यात येणार आहे.
शब्द सूरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबली साजरी केली आहे. वसंत देशपांडे यांनी गायलेल्या ‘प्रथम तुला वंदितो’, आशा भोसले यांच्या ‘या रावजी बसा भावजी’ व सचिन पिळगावकर यांच्या बेबी डान्स बेबी या गीतांनीही चांगलीच दाद मिळवली होती. ‘नाव मोठ लक्षणं खोटं’ ‘अरे संसार संसार’, ‘गंमत जंमत’, ‘धूमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘भुताचा भाऊ’, ‘अशी ही बनवा बनवी’ यातील सर्वच गीते आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालतात. ‘रुपेरी वाळूत’ या सांगीतिक कार्यक्रमातून पुन्हा त्या गाण्यांची याद ताजी होणार आहे.