तालवादक त्रिलोक गुर्टू, शिवमणी सहभागी होणार
बासरीवादक रोणू मजुमदार आणि घटम, मृदंगम आणि खंजीरावादक गिरीधर उडुपा आणि कीबोर्डवादक संगीत हलदीपूर यांचाही सहभाग असलेला ‘वंदन’ या खास कार्यक्रमाचे आयोजन ७ फेब्रुवारी २०१५ रोजी बांद्रा येथील सेंट ऍन्ड्र्युज सभागृहात सायंकाळी ७:३० वाजता करण्यात आले आहे.
प्रख्यात तालवादक त्रिलोक गुर्टू आणि शिवमणी ‘वंदन’ या फ्युजन संगीताच्या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध बासरीवादक रोणू मजुमदार आणि युवा घटम, मृदंगम आणि खंजीरावादक गिरीधर उडुपा आणि कीबोर्ड वादक संगीत हलदीपूर यांचाही या कार्यक्रमात सहभाग असून हा कार्यक्रम ७ फेब्रुवारी २०१५ रोजी बांद्रा येथील सेंट ऍन्ड्र्युज सभागृहात सायंकाळी ७:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.तंतुवाद्यकार त्रिलोक गुर्टू आणि तालवादक शिवमणी हे प्रख्यात कलाकार ‘वंदन’ या कार्यक्रमाच्या निमिताने पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. संगीताचे विविध अंग हे कलाकार आपल्या जादुई अदाकारीने प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. मुंबईकरांना त्या माध्यमातून नेहमी लक्षात राहील असा अविस्मरणीय अनुभव घेता येईल.
त्रिलोक गुर्टू हे भारतीय संगीतातील आघाडीचे तंतुवाद्यकार आणि पाश्चिमात्य ड्रमर आहेत. दूरदृष्टी असलेले संगीतकार त्रिलोक गुर्टू यांच्या सांगितीक प्रवासाने भारतीय आणि जगभरातील विविध संगीताचा अनोखा मिलाप साधला आहे. डॉन चेरी, जॉन मॅक्लोफ्लीन, जो झविनुल आणि पॅट मेथेनी यासारख्या कलाकारांच्या सहभागाने ते जॅझ संगीत प्रकारात प्रसिध्द आहेत. जॅझ फ्युजन बॅंडच्या निमित्ताने ते अमेरिकेतील प्रेक्षकांना पहिल्यांदा परिचित झाले. त्रिलोक यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले असून त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यात बेस्ट आर्टिस्ट, एशिया/पॅसिफिक नामांकन, बीबीसी रेडीओ ३ वर्ल्ड म्युझिक अवार्ड यांचा समावेश आहे.
शिवमणी हे प्रतिभाशाली कलाकार असून भारतातील नामवंत ड्रमर आहेत. त्यांच्या वादनात शास्रीय संगीताच्या शैलीचा समावेश आहे. प्रसिध्द गायक एस. पी. बालसुब्रहमण्यम यांच्यासोबत शिक्षण घेतलेले शिवमणी यांची जॅझ या संगीत प्रकारातील कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. शिवमणी त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांच्या वडिलांना देतात. ते सुद्धा एक उत्कृष्ट ड्रमर होते. वडिलांमुळे ड्रमर होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.शिवमणी यांच्या मते त्रिलोक गुर्टू हे त्यांची कल्पनाशक्ती हेरणा-या कलाकारांपैकी एक आहेत. ”माझे वडील एस. एम. आनंदन, नोएल ग्रॅंट, बिली कोभम, लुईस प्रभाकरन आणि त्रिलोक गुर्टू यांना मी गुरु मानतो. त्रिलोक भाई यांच्यामुळे मला माझी नव्याने ओळख झाली. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे.” असेही शिवमणी म्हणतात.
रानेन्द्रनाथ मजुमदार हे रोणू मजुमदार या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी बासरीवादनाचे शिक्षण त्यांचे वडील डॉ. भानू मजुमदार यांच्याकडे घेतले. पंडित विजय राघव राव यांच्याकडे रोणू यांनी मैफिलीतील बासरीवादनाचे धडे गिरवले. १९८१ साली ऑल इंडिया रेडीओ स्पर्धेत रोणू यांनी प्रथम पारितोषिक जिंकले, राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकही त्यांना मिळाले आहे. १९९६ मध्ये रोणू यांना बेला फ्लेक यांच्या सोबतच्या तबुला रस या अल्बमसाठी ग्रॅमी नामांकन मिळाले. रोणू मजुमदार हे आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकारांपैकी एक आहेत.
गिरीधर उडुपा हे जगातील नामवंत तालवाद्कांपैकी एक आहेत. विशेषकरून मृदंगम, खंजीरा आणि घटम ही त्यांची खासियत आहे. वयाच्या चवथ्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या सांगीतिक प्रवासाला सुरूवात केली. आजपर्यंत आपल्या विशेष अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचे वडील हे मृदंगम पंडित उल्लूर नागेंद्र उडुपा यांच्याकडून त्यांना मृदंगम, घटम आणि खंजीरा वादनाचे शिक्षण मिळाले. त्यानंतर घटम पंडित सुकन्या रामगोपाल आणि व्ही सुरेश यांच्याकडे त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
संगीत हलदिपूर हे भारतातील आघाडीचे कीबोर्डवादक आणि युवा संगीतकार आहेत. त्यांनी भारतीय शास्रीय संगीत, जॅझ संगीतप्रकार तसेच पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. मर्डर २, ब्लड मनी, आत्मा, फ्रुट ऍन्ड नट, बर्ड आयडॉल आणि हम हे राही कार के सारख्या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. संगीत हलदीपूर हे भारतातील प्रसिध्द व्हायोलीनवादक आणि प्रसिध्द संगीतकार अमर हल्दीपूर यांचे पुत्र आहेत.
द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक कार्यक्रमाला वेगळा अर्थ, वेगळी ओळख आणि वेगळी दृष्टी प्राप्त करून देणे आणि त्या माध्यमातून परिपूर्ण मनोरंजन साध्य करणे हे या संस्थांचे उद्दिष्ट आहे. जगभरातील रसिकांसमोर भारताचा भव्य आणि उंची सांगितिक वारसा सादर करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआरने आतापर्यंत कित्येक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी कृपया सेंट ऍन्ड्र्युज सभागृह, बांद्रा (पश्चिम) – २६४५९६६७ येथे संपर्क साधावा.