भारतातील सामान्य कलाकारांच्या असामान्य चित्रकृतींचे ‘आर्टमॉसफिअर’ हे अनोखे समूह चित्रप्रदर्शन मुंबईतील ७२, भुलाबाई देसाईरोडवरील सिमरोझा आर्ट गॅलरी येथे ६ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते ८ फेब्रुवारीपर्यंत कलारसिकांना सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत बघता येणार आहे.
आरती बगाई यांनी भारताच्या लहान गावातील आणि शहरातील कलेला व्यासपीठ मिळावे आणि या कलेचा प्रसार व्हावा यासाठी ‘आर्टिक’ या कलादालनाची स्थापना केली. भारतातील सामान्य कलाकारांच्या कलाकृती पाहिल्यानंतर त्यांनी ‘आर्टकि’च्या माध्यमातून त्या कला सादर करण्याचा निर्णय घेतला.
आरती बगाई म्हणतात की, ‘कलेचे चाहते असलेल्या मुंबई शहरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात मला अतिशय आनंद होत असून, कलाकारांना त्यांची कलाकृती सादर करण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मुंबईकरांकडून त्यांच्या कलेचे नक्कीच कौतुक होईल, असा आमचा विश्वास आहे. ‘आर्टिक’तर्फे कलेच्या चाहत्यांसाठी परवडणा-या किमतीत या कलाकृती उपलब्ध करून दिल्या जातात. भारतातील अनेक उदयोन्मुख कलाकार हे ‘आर्टिक’कडे असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जगभरातून ज्यांना पसंती मिळाली आहे, अशा कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
सिमरोझा येथे सादर होणा-या जयदेवन्ना यांच्या कलाकृती चेन्नपटना येथील खेळण्यांवर आधारित आहेत आणि रोजच्या जीवनातील हालचाली त्यांनी यातून रेखाटल्या आहेत. मैसोर येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयदेवन्ना हे त्यांच्या चित्रांना थ्री-डी इफेफ्ट देतात. सात थरांचे एक चित्र पूर्ण करण्यासाठी त्यांना एका महिन्याचा कालावधी लागतो.
कर्नाटकातील हुबळीजवळच्या एका खेडय़ातील काशिनाथ हे रंग आणि कल्पनाशक्ती यांच्या सहाय्याने उत्तम चित्रे रेखाटतात. भारताच्या खेडय़ांमधील ग्रामीण जीवन ते आपल्या चित्रंमधून मांडतात. धारवाड येथील प्रवीण हे भारताचा संपन्न वारसा असलेली सुंदर मंदिरे आपल्या तैलचित्रंच्या माध्यमातून दाखवतात. वर्षा खरटमल या जगाकडे रंग आणि हालचाली यांच्या नजरेतून पाहतात. त्यांचे पती हे सातारा येथील एका शाळेत कलाशिक्षक आहेत.
सोमानंद हे धारवाड येथे पोलीस पदावर कार्यरत आहेत. खेड्यातील शेती, झाडे, हिरवळ ही सर्वानाच मोहिनी घालणारी असते. ही मोहक दृष्ये हाताने रेखाटून त्यांनी त्यांचा कलेचा छंद जोपासला आहे. पुण्याजवळच्या तळेगाव येथील अमोल पवार यांची चित्रेही सुरेख आहेत. सुरेश गुलागे यांनी पुण्यातील ब्रिटीशांच्या काळातील वाडा आपल्या कलाकृतींमधून साकारला आहे. हैदराबाद येथील कप्पारी हे एक सरकारी महाविद्यालयात कलाशिक्षक आहेत. भारतीय स्त्री इतकी सुंदर आहे, की तिला तीचे सौंदर्य वेगळे उलगडून दाखवायची गरज पडत नाही, अशी त्यांची भावना आहे. दिनकर हे गडद रंगांचा वापर करून घोडय़ांचे प्रभावशाली चित्र काढण्यात सरस आहेत. तर मनोज आहेर हे कलाकार त्यांचा वैयक्तिक स्वभावातला शांतपणा त्यांच्या चित्रांतून रेखाटतात. भगवान शंकर यांनी प्रसन्न मुद्रेत असलेली समाधी आणि राधा कृष्ण याची अध्यात्मिक संगती हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत. या प्रदर्शनात शरद काळे, प्रमोद ठक्कर, रवी पुजारी, भूशय्या यांच्या कलाकृतीसुद्धा पाहायला मिळतील. गेल्या ४३ वर्षापासून सिमरोझा आर्ट गॅलरीने कलाकारांना शिल्पकला, चित्रकला तसेच छायाचित्र प्रदर्शनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.