चित्रकार संगीता बाबानी यांचे ‘अॅन अन्एंडिंग स्टोरी’ हे एकल चित्रप्रदर्शन मुंबईतील द आर्ट वाक गॅलरी, ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉईंट येथे २ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, ते १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत कलारसिकांना पाहता येईल.
स्पॅनीश चित्रकलेचे संस्कार झालेल्या संगीता यांचे विवाहपूर्व आयुष्य स्पेनमध्ये गेले आणि तिथल्या चित्रशैलीचे त्यांच्यावर संस्कार झाले. लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. स्पॅनीश आणि भारतीय कलेचा संगम असलेली अशी काहीशी अमूर्त चित्रे त्यांनी अलीकडच्या काळात रेखाटली असून, त्या चित्रंचे प्रदर्शन सुरू झाले आहे. जीवनात आलेल्या अनुभवांशी नाते सागणारी ही चित्रे आपल्याला वास्तवाकडे घेऊन जाणारी आहेत.
आयुष्यात कुठल्याच गोष्टीचे सरळ उत्तर मिळत नाही आणि जीवनाची तीच खासियत आहे. जगण्याची हीच प्रक्रिया कॅनव्हासवर कुंचल्याच्या सहाय्याने चित्रीत झाली आहे. स्त्रीची कॅनव्हासवर चित्रीत झालेली प्रतिमा तिच्या भावभावना आणि आर्तता ठळकपणे व्यक्त करते. संसारिक जबाबदारी पार पाडणारी स्त्री त्या व्यापातूनही पुरून उरते आणि स्वत:ला व्यक्त करू पहाते. टाटा नॅनोसाठी काम करणारी पहिली महिला कलाकार असलेल्या संगीता यांची ही चित्रे, स्त्रित्वाचे रंग कुंचल्याच्या सहाय्याने आकार घेऊन रसिकांच्या भेटीला आले आहेत.