काळा घोडा येथील हिरजी जहांगीर कलादालनात चित्रप्रदर्शन सुरु
मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार दीपक मेर आणि विजयलक्ष्मी मेर यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन हिरजी जहांगीर कलादालन, काळा घोडा येथे ५ फेब्रुवारी पासून सुरू झाले असून, वेगवेगळ्या चित्रविषयांची जुगलबंदी या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. हे प्रदर्शन रसिकांना ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे.
चित्रकर्ती विजयलक्ष्मी मेर यांनी आपल्या चित्र माध्यमातून निसर्गाच्या सहवासात, विचारात मग्न असणारी तरुणी, तिच्या विविध मनोभावना व त्यातील वैशिष्ट्ये सादर केली आहेत. जुन्या आठवणीत रमणारी तरुणी, तिची भावनिकता – आनंद, हर्ष, उल्हास, प्रतीक्षा तसेच तिच्या मनात उठलेले काहूर वगैरे दर्शविताना विजयलक्ष्मी मेर यांनी आपल्या तंत्रशुद्ध शैलीचा व माध्यमावरील प्रभुत्वाचा योग्य वापर केला आहे.
चित्रकार दीपक मेर यांनी आपल्या चित्रांमधून मुख्यत: देवाचे निवास, त्यातील शांति व धार्मिकतेबरोबर कुंडलिनी शक्ती, नागबंध वगैरेशी निगडीत असलेली श्रद्धा व भावना यांचे प्रतिकात्मक रंगमाध्यमातून दर्शन घडवले आहे. विविध मानवी आकार व उचित आकृतीबंध हयांचा समयोचित वापर करून त्यांनी निर्मिलेली वेगवेगळी चित्रे व त्यातील उत्कट संवेदना खरोखर मानवी मनाला थक्क करतात. ही चित्रे आपल्या मूलभूत वैशिष्ट्यांमुळे रसिकांशी संवाद साधतात व त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात हे निर्विवाद.