राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी चंद्रपूरच्या ‘नवोदिता’ने प्रशांत दळवी लिखित आणि प्रशांत कक्कड दिग्दर्शित ‘ध्यानीमनी’ या नाटकाद्वारे ५४व्या नाट्य महोत्सवात चौथे पुष्प गुंफले. नवोदिताने सादर केलेली ही संहिता जुनी असली तरी त्यातील मुलाच्या भावविश्वात रमलेल्या दांपत्याची अनोखी गोष्ट पाहताना रसिकांनी कधी डोळे पुसले, कधी हळवे झाले, त्या दोघांच्या कथेत रमले.
ही चार पात्री कलाकृती असली सारी भिस्त शालूची भूमिका वाटवणार्या नूतन धवनेवर होती. एकहाती हे नाटक ओढून नेण्यासाठी केंद्रस्थानी राहिलेल्या नूतनचा प्रयत्न कौतुकास्पद होता. कुठलीही कसर न सोडता एका आईची भूमिका ती प्रामाणिकपणे जगली. तिच्या पतीची अर्थात सदानंद पाठकची भूमिका सकारणारे प्रशांत कक्कड, समीर करंदीकरची भूमिका वठवणारे धनंजय धनगर आणि अपर्णा करंदीकर साकारणारी गायत्री देशपांडे यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
ध्यानीमनी हे संपूर्ण नाटक पाठक दांपत्याच्या घरात घडते. त्या घरातील सार्या वस्तू नीटनेटक्या मांडल्या गेल्या. घरातील कीचन, त्यातील भांडीकुंडी, भांड्यांचे कपाट, मुलाची अभ्यासिका, त्याचे खेळणे, त्याचे कपडे, पुस्तके… सारे काही खरे खरे! हे सारे खरे असले तरी एक गोष्ट मात्र काल्पनिक होती. त्या कल्पनाविश्वात रमणार्या शालू आणि तिच्या पतीचे भावविश्व हेच या नाटकाचं गुपित आहे. ते गुपित जाणून घेण्यासाठी ‘ध्यानीमनी’ रसिकांना गुंतवून ठेवते. सारे काही खरे असले तरी काल्पनिक काय होते, हे जणून घेण्यासाठी ध्यानीमनी पहायलाच हवे.
प्रा. डों. जयश्री कापसे यांनी निर्मिलेल्या या नाटकाचे नेपथ्य सतीश काळबांडे यांचे होते. प्रकाशयोजना हेमंत गुहे यांनी तर पार्श्वसंगीत अॅड. राहुल मेड्पल्लीवार यांनी दिले. रंगभूषा यतीन माझिरे यांनी तर वेशभूषा शीतल बैस यांनी चोखपणे सांभाळली.
हौशी रंगभूमीवर काही नाटकांनी आपली हक्काची जागा मिळवली आहे. ती नाटके वारंवार कलावंतांना खुणावत असतात. ते सादर करून कलावंत आपली ताकद अजमवून पाहत असतात. त्याच नाट्यसंहिताच्या यादीत आपले स्थान कामावणारे नाटक म्हणजे प्रशांत दळवी यांचे ध्यानीमनी हे नाटक होय. ते सादर करून चंद्रपूरच्या नवोदिताने जुन्या नाटकाची श्रीमंती या स्पर्धेत रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्याला रसिकांनी मनमोकळी दाद देऊन कलावंतांचा उत्साह द्विगुणित केला.