काळा घोडा येथील जहांगीर कलादालनात रासिकांचा उत्तम प्रतिसाद!
मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार गजानन सकपाळ यांनी आगळ्या वेगळ्या शैलीत साकारलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु असून या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हे प्रदर्शन गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून ते रसिकांना दि. ४ मार्च पर्यन्त रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे. बुद्ध हे शांततेचे प्रतीक मानले जाते. जगात शांतता नांदावी या उद्देश्याने भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध मुद्रा चित्रकार गजानन सकपाळ यांनी आपल्या चित्रात साकारल्या आहेत.
प्रत्येक चित्रकार हा आपल्या परिने स्वत:ला चित्र फलकावर व्यक्त करण्याचा मार्ग शोधत असतो. त्यासाठी तो विविध माध्यमे हाताळतो व त्यातून स्वत:ची अशी एक शैली विकसीत करतो.
चित्रकार गजानन सकपाळ यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध मुद्रा असलेली ही चित्रे साकारताना जी शैली अनुसरली आहे ती कलाकाराची खूपच कसोटी पहाणारी आहे. गजानन सकपाळ यांनी ही चित्रे फक्त आणि फक्त 00 (डबल झिरो) आणि 000 (ट्रीपल झिरो) क्रमांकाच्या सर्वात लहान आकाराच्या गोल कुंचल्यातून लक्षावधी रेषा वापरुन साकारली आहेत. या रेषांचा वापर करण्यासाठी त्यांनी अक्रीलिक रंग हे माध्यम निवडले आहे. हा रंग पृष्ठभागावर लावल्यानंतर त्वरीत वाळतो व जलाभेद्य होतो. त्यामुळे रेषा आकारताना जर चूक झाली तर ती सुधारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक केसासारखी बारीक रेषा आत्मविश्वासपूर्वक,विचारपूर्वक व सर्व अवधान बाळगूनहीउत्स्फूर्तपणे व तितक्याच जोमदारपणे कॅनव्हासवर उमटवावी लागते आणि त्यासाठी मनाची एकाग्रता,तल्लीनता,व्यासंग व चित्र विषयाशी एकतानता साधण्याची किमया साधावी लागते. चित्रात त्रिमिती परिणाम केवळ रेषांच्या सहाय्याने व छायाप्रकाशाचा कलात्मक परिणाम साधण्यासाठी खूप कालावधी घ्यावा लागतो. साधारणपणे त्यांच्या एका चित्राला पूर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागतो. त्यांनी आत्मसात केलेली आगळी वेगळी अशी व अपवादात्मक शैली खरंच प्रभावी आहे.
चित्रकार गजानन सकपाळ यांना बालपणापासून चित्रकलेची आवड होती. एस. एस. सी नंतर आय. टी. आय आग्रीपाडा येथे चित्रकलेचा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम श्री. आचरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यानंतर एक वर्षटेक्सटाइल डिझायनर म्हणून काम केले. स्वत: कमवा व शिका या पद्धतीने त्यांनी भारतातीलसुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून १९७८ साली जी. डी. आर्ट पेंटिंग ही पदविका मिळवली. तसेच मुंबई विद्यापीठाची एम.एफ.ए ही द्विपदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. आय. टी. आयआग्रीपाडा येथे कला शिक्षकाची नोकरी पत्करून त्यांनी पुढील वाटचाल सुरू केली. या कालावधीतचित्रकला क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच कालावधीत सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांचेसहाय्यक या नात्याने त्यांनी अनेक मोठमोठ्या आर्ट प्रोजेक्टसाठी काम केले. त्यामुळे त्यांना कलात्मक व व्यावसायिक अशा कला विश्वाची ओळख झाली व अनुभवाचे क्षेत्र विस्तारले गेले. साधारणपणे १९९६ मध्ये कलाशिक्षक या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ व्यावसायिक चित्रकार म्हणून इंटिरियर डेकोरेटर या क्षेत्रात स्वत:ची टीम निर्माण करून सांघिकपणे कला क्षेत्रात कार्य सुरू केले. या कालावधीत त्यांनी अनेक भित्तिचित्रे,म्युरल, कॅनव्हास पेंटिगस,डेकोरेटीव्ह शिल्पे इ. निर्मिती केली. श्री. सुधाकरराव नाईक, प्रफुल्ल पटेल, प्रतापराव राणे,अशोक हिंदुजा, विजयपत सिंघानिया, वेणुगोपाल धुत, माणिकचंद ग्रुप, भारती एयरटेल, इंडियन ऑइल,ओ.एन.जी.सी, जिंदाल ग्रुप, राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रा, श्रीदेवी, वाधवा बिल्डर, आर.एन.ए. बिल्डर,रहेजा बिल्डर, रिझवी बिल्डर इ. नामवंत राजकीय व्यक्ती, नामवंत उद्योगपती व सेलिब्रेटी, कॉर्पोरेट कंपन्या,सरकारी कंपन्या इत्यादीकरिता त्यांनी अनेक कलात्मक कामे केली. याच काळात स्वत:च्या स्वतंत्र शैलीचा ते मागोवा घेत होते. त्यातून त्यांच्या आगळ्या वेगळ्या अशा शैलीचा विकास झाला. केला. त्यातूनच भगवान बुद्धांच्याचित्रांची निर्मिती केली. सदर प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व चित्रे रसिकांना आवडतील असा त्यांना विश्वास आहे.यापुढे याच शैलीतील परंतु वेगळ्या विषयावरील चित्रांची ते निर्मिती करणार आहेत.