औरंगाबादच्या कलावंतांनी केली रसिकांची करमणूक
करणुकीचा बाज असलेल्या `पेइंग गेस्ट’ नाटकातून रसिकांचा हसवण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाच्या कलावंतांनी केला. घरात आलेल्या `पेइंग गेस्ट’भोवती संशयाचे वातावरण तयार करून हा संशयकल्लोळ राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पनवेलकरांनी अनुभवला.
पनवेलमध्ये सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऍड.रमाकांत भालेराव लिखित आणि वैभव बेलसरे दिग्दर्शित `पेइंग गेस्ट’चा प्रयोग पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सादर करण्यात आला. आई, बाबा आणि मुलगा मल्हार या तिघांचे कुटुंब असलेल्या घरात एका पेइंग गेस्टची गरज असते. मुलगा औरंगाबादवरून पुण्याला शिक्षण घेण्यासाठी जाणार असतो. त्याचे बाबा ऑफिसमध्ये व्यस्त राहणार असल्याने घरात आईला कुणाचीतरी सोबत हवी असते. त्यासाठी पेइंग गेस्ट पाहिजे असल्याची जाहिरात देतात आणि घरात आशा नावाची पेइंग गेस्ट मुलगी येते. त्या आशासोबत मल्हार प्रेमाचे संबंध विणण्याचा प्रयत्न करतो. दरम्यानच्या काळात आशा तिच्या एका मैत्रिणीलाही पेइंग गेस्ट म्हणून ठेवण्यासाठी विनंती करते. कुटुंबीय त्याला होकार देतात. डॉली नावाची दुसरी पेइंग गेस्ट घरात येते. मल्हार आता डॉलीमध्ये गुंततो. डॉली ही कोण, कुठून आली, आई-वडील कोण याचा काहीही पत्ता नसल्याने संशयाचे वातावरण तयार होते. या संशयकल्लोळात नाटक संपते.
मल्हारची भूमिका रूपेश परतवाघने साकारली असून, कोमल सोमारे(आई), वैभव बेलसरे (बाबा), रमेश मैंद (घरकाम करणारा विष्णू), प्रियंका जाधव (आशा), प्रेरणा खरात (डॉली), मनोज ठाकूर ( इन्स्पेक्टर 1), निमा कोकाटे (इन्स्पेक्टर2) यांनी भूमिका वठवल्या आहेत. विनोद आघाव-राम चव्हाण (नेपथ्य), भरत जाधव-विनोद आघाव (संगीत), चेतन ढवळे-मंगेश भिसे (प्रकाशयोजना), भरतसिंग दधरे (वेशभूषा), विशाखा शिरवाडकर-प्रदीप कांबळे (रंगभूषा) यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या.