राज्य नाट्य स्पर्धेत पणजीच्या कलावंतांनी गुंफले तेरावे पुष्प
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी पणजीच्या रुद्रेश्वर संघाने एका नटाच्या इच्छा मरणावर आधारित ‘महाप्रस्थान’ हे देखणे नाटक सादर केले. त्या नटाची भूमिका साकारणार्या कलावंताचा ऊर्जांकित अभिनय, कलात्मक नेपथ्य आणि सहकारी कलावंतांची यथोचित सोबत लाभलेल्या या नाटकाने थिएटरिकल नाट्याकलाकृतीचा आनंद पनवेलकर रसिकांना दिला.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू आहे. या स्पर्धेत अफसर हुसेन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘महाप्रस्थान’च्या प्रयोगाद्वारे बुधवारी तेरावे पुष्प गुंफले गेले. अनघा देशपांडे यांनी मराठी अनुवाद केलेल्या या नाटकाची गोष्ट जरी एका नटाच्या जीवन प्रवासाची, त्याच्या रंगभूमीच्या एकनिष्ठेची, समर्पित वृत्तीची असली तरी, नाटकाच्या आंत मानवी मनातील आंदोलनेही टिपली आहेत. एका नटाच्या जगण्यातले हेच संघर्षं वेगवेगळ्या माध्यमांत काम करणार्यांनाही लागू होणार आहेत. अनेकांना त्यांच्या वाट्याला येणारे वैफल्य, निराशा जगण्याची इच्छाच मारून टाकतात, जगणे नकोसे होते, त्यातून अनेक जण आत्महत्त्येचा मार्ग निवडतात, काही इच्छा मरण मागतात. या नटावर इच्छा मरण मागण्याची वेळ का येते, यासाठी हे नाटक बघायला हवे.
या नाटकातील नट अर्थात अभिलाशची भूमिका दीपक आमोणक यांनी ताकदीने साकारली. अभिलाशचा मित्र आणि सूत्रधाराची भूमिका वठवणा-या योगिश जोशी यांनी त्यांना मोलाची साथ दिली. पूर्ती सावर्डेकर (नीतू), संगम चोडणकर (आमदार) यांच्यासह कोरसमधील कलावंत प्रसाद कळंगूटकर, ऋषिकेश जोशी, ज्ञानेश्वर नाईक, चिरंजीव पेडणेकर, सुयोग परवद्दीन, साईशा नाईक, सिंधुराज कामत, तुषार आसुलकर, संतोष मयेकर, विवेकानंद च्यारी, सोमनाथ कर्पे, राधाबाई नार्वेकर, पुंडलिक सावंत, विशाल आसुलकर, नितेश नाईक, समीर नार्वेकर आदि सार्यांनी कोरसच्या माध्यमातून आपापल्या भूमिका यथोचित सांभाळल्या.
तांत्रिक बाजू सांभाळणारे सतीश नार्वेकर (प्रकाशयोजना), योगीश कापडी (नेपथ्य), अशोक परब (पार्श्वसंगीत), एकनाथ नाईक (रंगभूषा), स्वेता नार्वेकर (वेशभूषा) यांनी हे नाटक भक्कम करण्यासाठी मोलाची भूमिका वठवली.
छायाचित्रे – निखिल गोडसे