मुंबईच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद!
पनवेलमध्ये सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी मुंबईच्या युटोपिया कम्युनिकेशनने रोहन टिल्लू लिखित आणि प्रीतेश सोढा दिग्दर्शित ‘ती’ हे गूढ नाटय़ सादर करून रसिकांना कधी हसवले, कधी धक्के दिले तर कधी अभिनयासाठी उत्स्फूर्त दाद देण्यास भाग पाडले.
छायाचित्रे : निखिल गोडसे
देशपांडे नावाचा वकील एका पटवर्धन नावाच्या दिग्दर्शकाकडे त्याची गोष्ट घेऊन येतो. ती गोष्ट दिग्दर्शक त्याला वाचायला सांगतो. ती गाष्ट नाटक म्हणून वाचताना कशी वाचायची हे सांगत असतानाच तो त्या कथेत गुंतत जातो. ती प्रत्यक्ष सादर करण्यासाठी पटवर्धन स्वत: अॅड. देशपांडे होतो आणि त्या कथेत भेटणारी इतर पात्रे अॅड. देशपांडेला साकारायला सांगतो.
एका वकिलाने अनुभवलेली, अंगावर काटा आणणारी ही गोष्ट क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवत नेते. त्यातील वेगवेगळी पात्रे साकारताना देशपांडे आपल्या अभिनयाची ताकद सांगून जातो. देशपांडेची भूमिका साकारताना दिग्दर्शक पटवर्धनही एकजीव होऊन ही कथा पुढे नेतो आणि प्रेक्षकांना हादरवून टाकणारी रहस्यकथा क्षणाक्षणाला धक्के देत रंगत जाते.
दिग्दर्शक पटवर्धन आणि त्यानंतर अॅड. देशपांडेची भूमिका या नाटकाचे लेखक रोहन टिल्लू यांनी ताकदीने रेखाटली असून, अॅड. देशपांडे आणि त्यानंतर रहस्यकथेतील नामदेव, धर्माधिकारी, आनंद पाटील, पंढरी मामा, नारायणराव कदम, मोहितराव टांगेवाला, गणपतराव अशा असंख्य व्यक्तिरेखा ओमकार तिरोडकर यांनी त्या-त्या पात्रांच्या वैशिष्टय़ांसह रेखाटून आपल्या अभिनयाची ताकद अधोरेखित केली आहे. या रहस्यमय नाटकाला भयकंपित करण्यासाठी तिलोत्तमा या छोटय़ाशा भूमिकेतून शीतल कपोले लक्षवेधी ठरली. ओजस भट्ट-रिशित झवेरी यांचे पार्श्वसंगीत, दिगंबर आचार्य यांची प्रकाशयोजना, प्रीतेश सोढा यांचे नेपथ्य, वेशभूषा आणि सुभाष बिरजे यांची रंगभूषा हे रहस्यनाटय़ धक्कादायक होण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या.