मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार विजय गिल्ले यांचे ‘डिव्हाईन लव्ह’ हे एकल चित्रप्रदर्शन मुंबईतील तुलिका आर्ट गॅलरी, १२ रघुवंशी मिल्स, पहिला माळा, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ येथे ५ मार्चपासून सुरू झाले असून, ते २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात प्रेमांकित भक्तिभावाच्या रंगलेखनाचा आस्वाद कलारसिकांना बघायला मिळणार आहे.
अॅक्रिलीक रंगातील कॅनव्हासवरची ही चित्रे आंतरिक प्रेमभाव आणि भक्ती यांचा मिलाफ आहेत. राधा आणि कृष्ण यांचा आध्यात्मिक प्रेमभाव, आंतरिक ओढ, जिव्हाळा, आनंद,उत्कटता, तरल संवेदना, सखोल मैत्री या सर्व भाव–भावना यांचा मिलाफ या चित्रात झालेला आपणास पाहावयास मिळतो. या चित्रांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘लक्ष’ अर्थात एकाग्रता आणि सहभाग. मुख्य व्यक्तिरेखेत विलीन झालेली उपव्यक्तिमत्त्व यांचा अजोड संबंध या चित्रांमधून अनुभवायला मिळतो. आंतरिक प्रेम आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेल्या राधा–शामाची अनेक रूपे दाखवणारे हे प्रदर्शन आहे.
चित्रकार विजय गिल्ले यांचे बालपण लातूरच्या ग्रामीण भागात गेले आणि पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात त्यांनी आपले कला शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतरच्या काळात विजय यांनी आपली कला पुणे, मुंबईसारख्या शहरात एकल प्रदर्शनाद्वारे मांडली.