१६ मार्चपासून चित्रांचे प्रदर्शन
पुण्यातील प्रसिद्ध रंगलेखिका शरयू फरकंडे यांच्या ‘डिफरंट स्ट्रोक’ या चित्रांचे प्रदर्शन गेल्या महिन्यात अंधेरी येथील हॉटेल लीलाच्या कलादालनात यशस्वी झाल्यानंतर आता १६ मार्चपासून ते २९ मार्चपर्यंत नरिमन पाईन्ट येथील हॉटेल ओबेरॉयच्या कलादालनात सुरु होत आहे.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या शरयू फरकंडे यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले. एम.ए., बी.एड.सह ललित कलेची पदवी घेऊन नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कलाशिक्षिका म्हणूनही त्यांनी अध्यापन केले. करिअर म्हणून अशा वेगवेगळ्या जबाबदा-या सांभाळल्यानंतर त्या आता पूर्णपणे चित्रकलेत रमल्या आहेत. २०१०पासून आजवर दहा वेगवेगळ्या प्रदर्शनातून त्यांनी त्यांच्या कलाकृतींची ओळख सांगितली आहे.
या कलाप्रदर्शनातील चित्रकृतींमध्ये नृत्य हा विषय घेऊन रंगलेखन केल्यामुळे आपोआपच ही चित्रं लयबद्ध झाली आहेत. नृत्यात जसा ताल असतो, रिदम असतो तोच नेमका या कलाकृतींमध्येही साधला गेल्याने चित्ररसिकांची नजर खिळवून ठेवणारी ठरली आहेत. भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणा-या पारंपरिक नृत्यावर आधारित ही चित्रे आहेत. सोबतच खेडय़ातील खेळ आणि खेडूत सौंदर्याची नजाकत सांगणा-या काही कलाकृती लक्ष वेधून घेणा-या आहेत.