१५० कलाकारांना मिळणार ३४ लाख रुपयांचे रोख पुरस्कार
प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनचा पुरस्कार वितरण समारंभ
प्रफुल्ला डहाणूकर
प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनतर्फे देशभरातील तरुण कलाकारांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या १५० कलाकारांना एकूण ३४ लाख रुपयांचे रोख पुरस्कार गौरवण्यात येणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा ३१ मार्चला मुंबईतीलवरळीच्या नेहरू सेंटर ऑडिटोरीयममध्ये संपन्न होणार आहे.
‘कलानंद २०१५’ या कार्यक्रमांतर्गत होणार्या या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून विजया मेहता उपस्थित रहाणार आहेत. नेहरू सेंटर ऑडिटोरीयम, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई या ठिकाणी दि.३१ मार्च २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजता साजरा होणार्या या सोहळ्यात पं. सत्यशील देशपांडे यांच्या ‘लघू राग’ मैफिलीचं प्रमुख आकर्षणही असणार आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनतर्फे भारतातल्या सर्व तीस राज्यातल्या उभरत्या कलाकारांसाठी राज्यस्थरीय तसंच देश पातळीवरच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, प्रिंट मेकींग, इंस्टालेशन आणि छायाचित्र कला अशा क्षेत्रातील होतकरू तसंच नवोदीत कलारांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार मनीषा पाटील, चित्रकार रवी मंडलीक आणि चरण शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. स्पर्धेत यशस्वी झालेल्या १५० कलाकारांना एकूण ३४ लाख रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सुवर्ण पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये अभिषेक डे, चित्रकला (हावडा), प्रशांत बांगल, शिल्पकला (पुणे), श्रीमती अंजू गुप्ता मौर्य, मातीची भांडी (चंदिगड), केदार प्रदीप नामदास, प्रिंट मेकींग (पुणे), श्री शोवीन भट्टर्जी, प्रतिष्ठापन (दिल्ली) आणि दिल्लीचे निसंशय सारदाना याना फोटोग्राफीसाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांची पारितोषकं प्रदान करण्यात येतील. प्रसिद्ध कलाकार थोटा वैकुंटम यांना रुपये दोन लाखाच्या कला संपादन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. इतर विजेत्या कलाकारांचा तपशील www.prafullafoundation.comया संकेत स्थळावर पाहता येईल.
होतकरू आणि तरूण कलाकारांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने ‘प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील अनेक नामवंत कलाकारांनी फाउंडेशनच्या कार्यात मोलाची मदत केली असून कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील कलाकारांचं एक उत्तम जाळं या माध्यमातून उभं करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. फाउंडेशनतर्फे कलाकारांच्या कलेला माध्यम आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणं असा दुहेरी उद्देश ठेवण्यात आला आहे. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या प्रांगणात तेजोमय रवीकिरणांच्या साक्षीने स्थापन झालेल्या ‘प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन’ची पताका आता देशभरातील कलाकारांच्या खांद्यावर डौलाने फडकायला लागली आहे.