नागपूरच्या रंगलेखिकेचे मुंबईत चित्रप्रदर्शन सुरू
नागपूर येथील प्रसिद्ध चित्रकर्ती प्रज्ञा बेसेकर यांच्या नवनिर्मित कलाकृतींचे प्रदर्शन काळा घोडा येथील हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये २६ मार्चपासून सुरू झाले असून, ते १ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री कल्पना सरोज (सीईओ,कमानी ट्यूबस) यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शनात प्रज्ञा बेसेकरने आपल्या चित्रमाध्यमातून निसर्गवैभवाचा एक रम्य व वैशिष्ठ्यपूर्ण खजिना कलात्मक शैलीतून मांडला आहे.
प्रज्ञा बेसेकर यांनी आपल्या प्रदर्शनात निसर्गवैभवाचा, त्यातील भव्यतेचा व रम्यतेचा तसेच अदभूत अशा चमत्कृतीचा एक नयनरम्य व मनोहर आविष्कार साकारला आहे. निसर्गरम्य परिसरातील सृष्टीसौंदर्य व देखावे यावर भर न देता त्यांनी भावनिकतेचा व वास्तवाचा एक आशावादी आविष्कार सादर केला आहे. विविध वृक्ष त्यांची अनेक रूपे व त्यांना असणार्या भावना आणि संवेदनशीलता, मानव आणि निसर्ग यात असणारे अतूट नाते व त्यातील दृढता त्यांनी आपल्या चित्रातून रेखाटली आहे. निसर्गातील वृक्षसौंदर्य त्यांची भावोत्कटता, संवेदनात्मक मानसिकता आणि गूढ अशी रम्यता दर्शविताना त्यांनी आपल्या अनोख्या शैलीद्वारे विविध भावनांना दृश्यरूप दिले आहे व त्यात आपल्या तंत्रशुद्ध शैलीचे व माध्यमावरील प्रभूत्वाचे आणि वास्तववादी दृष्टीकोनाचे अतिशय बोलके दर्शन सर्वांना घडविले आहे.
परस्परांविषयी संवेदनात्मक आत्मीयता,सर्व मानवास असणारी निसर्ग चमत्कारांविषयी ओढ व त्यातील प्रशंसनीय व लक्षणीय अशी एकतानता याचे दर्शन घडविले आहे. आनंद, हर्ष,उल्हास, उत्साह व आवेश या भावनांचेअर्थपूर्ण विवेचन केले असून, त्याबरोबरच परस्परसंवादातील निरामयता, दैवी अर्थपूर्णता व त्यातून उत्पन्न होणारी, सकारात्मक ऊर्जा या मानवी मनोभावनांचे रम्य दर्शन चित्रांमधून साकारले आहे. विविध ऋतूंमध्ये आढळणारी निसर्गाची रम्य रुपे व त्यातील विस्मयकारक भिन्नता,छाया, प्रकाश, सावल्या आणि मूर्त तसेच अमूर्त प्रकृतिमूल्यांमध्ये आढळणारी विसंगती कल्पकतेने समन्वय साधून प्रज्ञा बेसेकरने अर्थपूर्णता व आशयघनता अनेक कलारूपांना अलंकृत केले आहे. निसर्ग संगीत व निरामय शांतता तसेच सुखोत्पती बरोबरच वास्तवाचे दर्शन घडविणारा जीवनाविषयीचा प्रगल्भ असा दृष्टीकोन व ती प्रगत मानसिकता वगैरेच्या आधारे कला माध्यमातूनसर्वांशी बोलका व अर्थपूर्ण संवाद साधताना चित्रकर्तीने दर्शवलेली सकारात्मक मानसिकता व वैशिष्ट्यपूर्ण व स्पष्ट अशी संवेदनात्मक पारदर्शकता वगैरेमुळे हा चित्रखजिना खरोखर सर्वांना आत्मानंदासह एक आगळी वेगळी अनुभूति देईल.