संस्कृती कल्चरल अकादमीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने कलामंजिरी या कार्यक्रमाचे आयोजन ११ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी नामवंत नृत्यांगना मनाली देव यांचा कथ्थक शैलीतील नृत्याविष्कार सादर होणार आहे.
नृत्यकलेच्या शास्त्रीय स्वरुपाची जोपासना आणि सेवा करणारे अनेक महान नृत्यकलावंत भारतात होऊन गेले. त्याच परंपरेला अनुसरुन रंगमंचावर कलेचा आविष्कार व्हावा या हेतूने नृत्यांगना रुपाली देसाई यांनी गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाचे औचित्य साधून संस्कृती कल्चरल अकादमीची स्थापना केली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध तबलावादक पंडित मुकुंद राजदेव त्यांना तबला साथ करणार आहेत. तसेच अतुल फडके आणि अनंत जोशी (हार्मोनियम), प्रसाद रहाणे (सतार), हनुमंत रवाडे (पकवाज) आणि वर्षा भावे व प्राजक्ता जोशी (गायक) यांची संगीत साथ लाभणार आहे.
गेली अनेक वर्षे नृत्य साधना करणा-या रुपाली देसाई संस्कृती नृत्य कला मंदिराच्या माध्यमातून अनेक नव्या विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त नृत्य शिक्षणाचे धडे देत आहेत. नृत्यक्षेत्रात स्वतःचे योगदान तर आहेच, शिवाय नवीन कलाकार तसेच बुजुर्ग कलाकारांचा कलाविष्कार या अकादमीच्या महोत्सवाच्या माध्यमातून यापुढे सादर व्हावा हे ध्येय मनाशी ठेवून संस्कृती कल्चरल अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. यंदाचे हे पहिले वर्ष असल्याने कार्यक्रमाची व्यापती मर्यादित असली तरी आगामी काळात या अकादमीच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस रुपाली देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.