लग्नाचं नेमकं लॉजिक समजावणारं विनोदी नाटक
तृप्ती प्रॉडक्शन, मनस्वी क्रिएशन आणि रोहित एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्माते अशोक शिगवण व राजेश घाडगे यांचं “लग्नलॉजी” हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत असून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार आहे.
सुनील हरिश्चंद्र लिखित व सुदेश म्हशीलकर दिग्दर्शित “लग्नलॉजी” हे नाटक नवरा–बायकोच्या नात्यावर आधारित आहे. लग्नापूर्वीची सायकोलॉजी आणि लग्न झाल्यावर त्यात होणारे बदल या नाटकात अतिशय मार्मिकपणे रेखाटण्यात आले आहेत. स्त्री आणि पुरुष ह्या दोन भिन्नलिंगी मानवाचा मानसिकतेचा व त्याच्या एकूणच वागणूक आणि शरीररचनेचा सखोल अभ्यास करून मनोरंजक विनोदी कथानकाच्या माध्यमातून वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्त्री-पुरुष यांचे मेंदू आणि त्यांची कार्यक्षमता याचाही शास्त्रीय संदर्भ बेमालूमपणे घेऊन प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीत भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांचाही स्वभाव, वागणे आणि मानसिकता यात फार मोठी तफावत असते आणि जेव्हा ही दोन वेगळ्या प्रवृत्तीची, वेगळ्या विचारांची आणि भिन्न कार्यक्षमतेची माणसं लग्नाच्या निमित्ताने एकत्र येतात त्या उपरांत होणारा एकूणच बरा वाईट प्रवास या नाटकातून प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.
“लग्नलॉजी” या नाटकाची संकल्पना प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते सुदेश म्हशीलकर यांची असून नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. यातील शीर्षकगीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून हे शीर्षकगीत अवधूत गुप्ते यांनी गायिले व संगीतबद्ध केले आहे. पार्श्वसंगीत राहुल रानडे, नेपथ्य सचिन गोताड, प्रकाश शीतल तळपदे, वेशभूषा प्रकाश निमकर, रंगभूषा राजेश परब यांची असून संतोष सिदम या नाटकाचे सुत्रधार आहेत. यात प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता सुदेश म्हशीलकर, अभिज्ञा भावे आणि सध्याचा आघाडीचा अभिनेता संतोष जुवेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.