जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्र-शिल्प प्रदर्शन सुरु
कोलकाता येथील चंदन भौमिक, देबाजीत चक्रवती, दिपांकर कर्माकर, मानस साहा, रथिन डे, स्मिता नंदी, सुशांत चौधरी, सौमेन दास आणि तापस मजूमदार या सुप्रसिद्ध नऊ चित्र व शिल्पकारांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या चित्र व शिल्पाकृतीचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑडीटोरियम हॉलमध्ये दि. १४ एप्रिलपासून सुरू झाले असून ते सोमवार दि. २० एप्रिलपर्यंत रसिकांना ११ ते ७ या वेळेत पाहता येईल.
चित्रकार चंदन भौमिक यांनी कॅनव्हासवर अक्रीलिक रंगलेपणातून साकारलेली त्यांची अमूर्त शैलीतील विविध चित्रे मनोवेधक व आकर्षक आहेत. त्यात मानवी जीवनाचे वास्तव दर्शविताना चित्रकाराने आपल्या कलात्मकतेचा व तंत्रशुद्ध शैलीचा योग्य वापर केला असून त्यामुळे हा कलाविष्कार मनास भावतो. शिल्पकार देबाजित चक्रवती यांनी निर्मिलेल्या त्यांच्या विविध कलाकृतीमध्ये जीवनातील विदारक अशा वास्तविकतेचे दर्शन यामुळे हे काम सर्वांच्या अंतर्मनाचा ठाव घेते. शिल्पकार दिपांकर कर्माकर यांनी कॅप्रेशीअस स्टोनवेअर धातू व काष्ट यांचा कलात्मक वापर करून निर्मिलेली त्यांची विविध शिल्पे आकर्षक असून मानवी जीवनातील बहुरंगी अनुभवांचा त्यात आढळणारा लक्षणीय प्रभाव प्रत्येक रसिक मनास आवडेल. चित्रकार मानस साहा यांनी अक्रीलिक रंगलेपणातून कॅनव्हासवर साकारलेली त्यांची विविध चित्रे जीवनातील वास्तवाचे बोलके व अर्थपूर्ण दर्शन घडवितात. त्यातील दृश्यपरिणाम व वैविध्य खरोखर प्रशंसनीय आहेत. शिल्पकार रथिन डे यांनी ब्रौंझ व धातूचे पत्रे, रंग व इतर माध्यमातून अतिशय कल्पकतेने मांडलेली त्यांची विविध शिल्पे खरोखर आकर्षक व नयनरम्य असून आपला मूलभूत वैशिष्ट्यपूर्ण कलागुणांमुळे ती सर्वांना एक वेगळ्याच दृश्यपरिणामांद्वारे आगळीवेगळी अनुभूति देतात.
शिल्पकार स्मिता नंदी यांच्या फायबर ग्लास माध्यमातील विविध कलाकृती खरोखर मानवी जीवनातील विविध रंग व त्यांचा बहुआयामी वास्तवदर्शी आविष्कार दर्शवितात. प्रत्येक कलाकृतीतील उत्कृष्ट सादरीकरण व तिचा वेगळेपणा अदभूत व अनोखा आहे. चित्रकार सुशांत चौधरी यांनी जलरंग व अक्रीलिक रंग वापरुन आर्ट पेपरवर साकारलेली विविध चित्रे त्यातील विचार व प्रासंगिकता ठळकपणे दर्शवितात. जीवनातील विविधरंगी आयामांचे एक कलात्मक दर्शन खरोखर येथे सर्व रसिकांना घडते. शिल्पकार सौमेन दास यांची ब्रोंझ मधील विविधांगी शिल्पे खरोखर चित्ताकर्षक व रम्य असून त्यात दर्शविलेली प्रगल्भता व विषयाची नेमकी अर्थपूर्ण मांडणी प्रकर्षाने जाणवते. तसेच त्यातील कलात्मकता व वास्तव खरोखर लक्षणीय व प्रशंसनीय आहे. चित्रकार तापस मजुमदार यांनी जलरंग व पेन आणि शाई वापरुन आर्टपेपरवर सादर केलेली विविध चित्रे खरोखर कलाकारांची वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता दर्शवितात. एकंदरीत कलारूपांचे विविध पैलू येथे सामूहिकरित्या साकारताना सर्व चित्र व शिल्पकारांनी आपल्या शैलीचे व रंगमाध्यमावरील प्रभूत्वाचे एक मनोहर दर्शन घडवले आहे हे निर्विवाद.