जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रप्रदर्शन सुरु
मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार जयश्री गोराडीया यांनी अलिकडच्या काळात चितारलेल्या चित्रांचं ‘द कम्लीट बिईंग’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे १४ एप्रिलपासून सुरु झाले असून ते २० एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार जयश्री गोराडीया यांनी आपलं कला शिक्षण मुंबईच्या एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्टमधून पूर्ण केलं असून आजपर्यंत अनेक एकल आणि समूह कलाप्रदर्शनांमधून त्यानी आपली कला रसिकांना सादर केली आहे. दरम्यान त्याना ऑल इंडीया आर्ट ऍन्ड क्राफ्ट सोसायटीने पुरस्कार देवून गौरवीलं आहे.
पूर्णत्वाचा साक्षात्कार झालेली ‘स्त्री’ हाच त्यांच्या या प्रदर्शनाचा विषय आहे. तीचे सडेतोड विचार, भाव–भावना या प्रदर्शनात कॅनव्हासवर उतरल्या आहेत. सुंदरतेचं लेणं लाभलेली ‘स्त्री’ ही केवळ उपभोग्य वस्तू नाही. ‘ती’ केवळ सुंदरच नाही तर ती त्याहूनही बरंच काही आहे. जयश्री गोराडीया यांच्या कुंचल्यामधून अवतरलेली ‘ती’ म्हणते
तू सुंदर आहेस…
तू सुंदर आहेस……
तू सुंदर………..
खबरदार पुन्हा असं बोललास तर
‘मी’ शब्दातीत आहे.
माझ्या अंतरंगातील खोली शोधण्याचा प्रयत्न करून पहा..
बघ मी किती शौर्यवान आहे, किती धैर्यवान आहे,
पहायचंच असेल तर माझं बुद्धीचातुर्य पहा..
माझ्या हजरजबाबीपणाला दाद दे…
‘मी’ ह्सण्याने सारं जग हसतं,
माझ्या आनंदात सारं जग डुलतं…
स्तूती करायचीच असेल तर मी केलेल्या पालनपोषणाची कर
या जगाच्या सौदर्यात ‘मी’ घातलेली भर बघ…
माझ्या हृदयातून पाझरणारी करुणा पहा,
पहा, माझ्या बुद्धीचातुर्याने कलात्मकतेत कशी वाढ झाली…
माझ्या सभोवताली ही बंधन घालू नकोस…
‘मी’ काय करावं, काय नको ते मला शिकवू नकोस…
मला मर्यादेचं भान आहे,
म्हणून म्हणते…
तू सुंदर आहेस…, असं म्हणू नकोस
बघ…. मी सगरासारखी अथांग आहे,
माझी अनेक रुपं तू अजून पाहिलेली नाहीत,
माझ्यातल्या अपार अंतरंगाचा ठाव अजून लागायचा आहे,
मी फक्त सुंदरच नाही, तर…
मी पूर्णत्व आहे..
मी पूर्ण‘स्त्री’ आहे.
चित्रकार जयश्री गोराडीया यांनी कॅनव्हासवर रेखाटलेलं त्यांच्या अंतरातलं हे स्त्री रुप पहायला आपल्यालाही आवडेल.