जहांगीर कलादालनात भरणार चित्रप्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार ज्ञानेश्वर जगदाळे यांनी अलिकडच्या काळात चितारलेल्या चित्रांचं ‘फेथ’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे २१ ते २७ एप्रिल २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार ज्ञानेश्वर जगदाळे यांनी ध्यानधारणेव्दारे आपल्यातील सुप्त शक्तींचा शोध घेतला आणि त्यामधून आलेली जाणीव कॅनव्हासच्या माध्यमातून पेश केली आहे. ध्यानाच्या माध्यमातून घेतलेला प्रेरणांचा शोध, त्यामधून सापडलेलं सत्य, करुणा, प्रेम, शांती याचं वैभव आणि त्याची अनुभूती ही या कलाकाराने स्वत: पुरतीच न ठेवता दर्शकानाही देऊ केली आहे.
कैलास पर्वतावर वास करणारे ध्यानमग्न शिवशंकर, विणेचा झंकार करणारी देवी सरस्वती, अर्धनारी नटेश्वर, हलाहलाचं प्राशन करून अखिल विश्वाचं रक्षण करणारे भगवान शंकर, व्दापार आणि कलीयुगाचा सांधा साधणारा समरधुरंधर श्रीकृष्ण, निर्वाणाचा सोपा मार्ग सर्व मानव जातीला दाखवणारे भगवान गौतम बुद्ध अशा देवदेवतांचं साकार रुप चित्रकार ज्ञानेश्वर जगदाळे यांनी रसिकांसमोर सादर केलं आहे.
गडद आणि फिकट रंगांचा सुयोग्य वापर, दर्शकाला आध्यात्मिक अनुभूती देणारं देव-देवतांचं साजरं रुप, मर्त्य मानवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारं गुढ हास्य अशी ही रुप नास्तीक आणि आस्तीक अशा दोघांनाही आकर्षीत करणारी आहेत. दर्शकाला अंतरंगात डोकावून पहायला लावणारं हे प्रदर्शन म्हणूनच एक वेगळा अनुभव ठरेल. असलेल्या श्रद्धा आणखी मजबूत होतील आणि अश्रद्धालाही क्षणभर डोळे मिटायला लावेल.