कोकणाला जागतिक पर्यटनाचा दर्जा देऊ –मुख्यमंत्री
कोकणाला आणि कोकणच्या लोककला, संस्कृती, शेती, उद्योग या वैभवाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्याला ख-या अर्थाने ‘ग्लोबल’ बनविण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे ‘ग्लोबल कोकण’ हा भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाही ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री विद्याताई ठाकूर, ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे अध्यक्ष आ. भाई जगताप, स्वागताध्यक्ष आ. अॅड.आशिष शेलार, आ.सुनील प्रभू, आ.किरण पावसकर, माजी खासदार संजीव नाईक, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, माजी आ.प्रमोद जठार, बाळासाहेब माने, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अरुण बोंगीरवार, एम.टी.डी.सी चे पराग जैन नानुटीयाजी, वल्सा आर. नायरसिंग आणि ‘ग्लोबल कोकण महोत्सवाचे’ कार्याध्यक्ष संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते.
२०१७ साली ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष साजरे करण्यात येणार असून यावेळी जगभरातील पर्यटकांना कोकणासह राज्यातील इतर पर्यटनांकडे आकर्षित करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्याचा उद्देश या योजनेमागे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या संदर्भात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली, केंद्र सरकारतर्फे ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरु करण्यात आली असून या योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणाची ख्याती जगभर पोहोचावी यासाठी पब्लिसीटीवर अधिक भर देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील महिन्यात कोकणातील नेत्यांसोबत एक बैठक घेऊन पुढील दोन वर्षाचा आराखडा तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी खास निधी राखून ठेवावा आणि येत्या तीन महिन्यात एक योजना तयार करून पाच वर्षात टप्याटप्याने याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संजय यादवराव यांनी केली.
कोकणात जर पर्यटनाचा विकास झाला तर कोकणातला तरुण हा कोकणातच राहील आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेला हातभार लागेल असे ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले. ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातल्या ३७८ तरुणांनी स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय सुरु केले असेही पुढे आ. भाई जगताप म्हणाले.
‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान मुंबईत गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात कोकणातील लोककला नृत्यस्पर्धा, फोटोग्राफी, पेंटिग्ज, शॉर्टफिल्म आदी विविध स्पर्धांच्या आयोजनाद्वारे कोकणी कलाकारांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या महोत्सवाला अवश्य भेट द्या असे आवाहन आयोजकांनी केले आहे.