२५ मेपासून जहांगीर कलादालनात चित्रप्रदर्शन
मुंबईच्या युवा चित्रकार स्वीटा राय यांचे ‘अनव्हेल अनकॉन्शिस’ हे प्रदर्शन काळा घोडा येथील हिरजी जहांगीर कलादालनात २५ मेपासून भरणार असून, ते प्रदर्शन ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. बंधनात राहून कंटाळवाणे जीवन जगण्याला विरोध असणा-या या रंगलेखिकेने आपल्या जीवनविषयक विचारांचे प्रतिबिंबच या प्रदर्शनाद्वारे रसिकांसमोर मांडले आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक चित्राची एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ते चित्रच आपली कथा सांगत आहे, असा भास होतो. बालपणाचा खटयाळपणा, तारुण्याच्या वाटेवरचा अल्लडपणा, पहिलं प्रेम, ममतेचं नातं, आयुष्यात घेतलेली धोकादायक वळणं असे अनेक विषय या चित्रांमधून मांडले आहेत.
कलेमध्ये मानवी मनाचे अंतरंग उघडे करून दाखवण्याची ताकद असते, असे मानणा-या आणि त्या अनुरुप काम करून कलेच्या साहाय्याने ते उघड करणा-या कलाकृती स्वीटा राय यांनी सदर प्रदर्शनात मांडल्या आहेत. कलेला मानवी शरीर, मन आणि आत्मा यांपासून वेगळे करू शकत नाही.
कलेच्या माध्यमातून जीवनाची सत्यता कॅनव्हासवर जिवंत करण्याचे काम राय यांच्या चित्रांमधून झालेले आपणाला पाहायला मिळेल. नेहमी वेगळा विचार करणा-या या रंगलेखिकेने तिच्या प्रेक्षकांनाही स्वत:चा विचार करायला प्रवृत्त केले आहे.
प्रत्येक माणसाचे अनुभव वेगळे असतात आणि त्यानुसार त्याची जडणघडण होत असते. पण हे असे अनुभव चित्ररूपाने कॅनव्हासवर चित्रित करण्याची कला हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्टय ठरावे.