अकरा प्रथितयश कलाकारांच्या शिल्प-चित्रांचे प्रदर्शन
देशातील अकरा प्रथितयश कलाकारांचं ‘सुपर रेन्बो’ हे कलाप्रदर्शन हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटल, जे.बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई येथे दिनांक २ ते १५ जून २०१५ या काळात सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
मुंबई, ठाणे, विरार, वसई, अहमदाबाद या सारख्या अनेक ठिकाणचे विविध स्तरातील कलाकार एकत्र येवून चित्रकृती आणि शिल्पकृतींचं देखणं प्रदर्शन मांडणार आहेत. वैश्विक परिणाम, आध्यात्मिक प्रभाव, प्रदीपन/ब्राइटनेस, सौंदर्याचा प्रभाव, दृष्य अनुभव, निसर्गाचे अनेक अविष्कार आणि त्याचे चमत्कार इत्यादी जीवनावर खोलवर परिणाम करणार्या अनेक कलाकृती या प्रदर्शनात असतील. पाहणार्याच्या मनात उत्साह, जोम आणि सकारात्मक आशा ऊर्जा निर्माण करण्याची ताकद या कलाकृतींमध्ये आहे. मुर्त, अर्धमुर्त, अमुर्त अशा अनेक प्रकारची चित्रं, तैल रंग, मिश्र माध्यमं, एक्रिलीक रंग, जलरंग, चारकोल, पेन आणि शाई यांचा वापर करून कॅनव्हास तसंच कागदावर ही चित्रं साकार केली आहेत. उजळ रंग, छाया-प्रकाश, प्रतिबिंब यांचा अनोखा मेळ या चित्रांमध्ये घातलेला दिसतो.
या प्रदर्शनात भाग घेतलेल्या कलाकारांमध्ये अहमदाबादचे सुप्रसिद्ध शिल्पकार दिपक ढोलकीया यांच्या मिश्र माध्यमातील कलाकृती या कलादालनात मांडल्या गेल्या आहेत, त्यानी शेठ सी. एन. कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाईन आर्ट मधलं आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे.
वसईच्या मंजिरी राउत यांनी वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्वल आर्टमधून पदवी प्राप्त केली असून त्या मुंबईत कला शिक्षीका म्हणून काम करीत आहेत. म्युरल डिज़ायनींग आणि पेंटीगमध्ये पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या विद्या चोगले यांनी जी.डी.आर्ट आणि फोटोग्राफीचा अभासक्रम पुर्ण केला असून टेक्स्टाईल विविंगमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
कल्पेश शाह यांनी एक्रिलीक रंगात कॅनव्हासवर चित्रीत केलेल्या चित्रांमधून आध्यात्मिक कलाकृती सादर केल्या आहेत. त्यानी शेठ सी. एन. कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाईन आर्टची पदवी घेतली आहे.
दिनेश कुमार परमार यांनी एक्रिलीक आणि मिश्र माध्यमामधून आपली कला सादर केली आहे. त्यानी शेठ सी. एन. कॉलेज ऑफ फाईन आर्ट मधून शिक्षण पुर्ण केलं आहे. सुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो) हे देवनागरी लिपीतील स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून साकार करणारे सुलेखनकार म्हणून कला जगताला ज्ञात आहेत. ते जे.जे स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत.
राजस्थानचे प्रसिद्ध कलाकार आणि लेखक सुनिल संखला (‘अंतरिक्ष’) यांनी ड्रॉईंग आणि पेंटींग मध्ये एम. ए. केलं आहे. अनेक समुह आणि एकल प्रदर्शनांमधून त्यांनी आपली कला सदर केली असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
विश्वनाथ तावडे यांनी नृत्य आणि नर्तक यांची एक्रिलीक रंगात रंगवलेली वास्तव चित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. देश विदेशातील अनेक संग्रहकांजवळ त्यांची चित्रं पोहोचली आहेत. शेठ सी. एन. कॉलेज ऑफ फाईन आर्टमधून शिक्षण पुर्ण केलेले सुरेश शाह यांची चित्रं गुजरातच्या विविध कलादालनात मांडली गेली आहेत.
विरारचे प्रसिद्ध कलाकार संजय राऊत हे एक्रिलीक रंगात रंगवलेल्या गणपतीच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. सुर्यकांत राजापकर यांनी एल. एस. रहेजा स्कुल ऑफ आर्ट आणि जे.जे स्कुल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलं असून एक्रिलीक रंगात कॅनव्हासवर रंगवलेल्या वास्तववादी चित्रांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.