आशिष इरप यांच्या चित्रांचे प्रदर्शन
चित्रकार आशिष इरप यांच्या चित्रांचे प्रदर्शन २ जूनपासून जहांगीर कलादालनात सुरु होत असून ते ८ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. भारत आणि इंग्लंडमधील अनेक कलादालने आपल्या रंगलेखनाने त्यांनी यापूर्वी सजवली आहेत. हा समकालीन कलावंत त्याच्या चित्रांमधून जीवनप्रवासाचा वेध घेतो. विहंगम निसर्गदृश्य, निसर्ग वस्तू आणि माणूस यांचे नाट्यपूर्ण चित्रण हे त्यांच्या रंग्लेखानाचे बलस्थान आहे. विस्मयकारक कौशल्यामुळे त्याच्या चित्रांमधील छायाप्रकाशाच्या दृश्यात रसिक मंत्रमुग्ध होतात.
विविध रंगछटांच्या सुयोग्य निवडीतून विलोभनीय वातावरणाची ते निर्मिती करतात. आशिष यांच्या बहुसंख्य चित्रांमध्ये प्रकाशाचे सुखद अस्तित्व जाणवते. चित्रवस्तूच्या मागून येणारा प्रकाश त्यांच्या चित्रांना गहिरी खोली पाप्त करून देतो.
आपण राहतो ती शहरे आणि वस्त्या आपली मने आणि आपले अस्तित्व यांना कसा आकार देतात तसेच ती आपल्याबद्दल काय दर्शवितात – आपण कुठून येतो आणि आपण कुठे जाऊ पाहतो या सा-याचा मागोवा त्यांची चित्रे घेतात.
सध्याच्या स्थापत्यामधील नमूने घेऊन, आशिष त्यांची आणि त्यातील रचनांची मोडतोड करून त्यातून पुन्हा सौंदर्यपूर्ण रंगांमधून स्वप्नवत जगाची निर्मिती करतात जी आपले अस्तित्व आणि प्राधान्य यांच्यापुढे पश्नचिन्ह उभे करतात. काम आणि त्यातील प्रकिया यातून आशिष आनंद घेतात. त्यांच्यासाठी निर्मितीतच तो आनंद असतो. ते अनेक माध्यमे हाताळतात, पण जलरंगांमध्ये त्यांचे खरे सामर्थ्य दिसून येते.