‘कलर्स मराठी’वरील मालिकेचे चित्रीकरण
प्रसन्न करणा-या सप्तशृंगी मंदिर गडावरील नयनरम्य वातावरणात कलर्स मराठीच्या ‘माझिया माहेरा’ या मालिकेचे शूटिंग नुकतेच करण्यात आले. कलाकारांनी भाविकांसोबत सप्तशृंगी मातेचा गजर करत वणीचा गड चढला, शिवाय देवीची यथासांग आरती केली. तेथील भक्तीपूर्ण वातावरणाने कलाकार भारावून गेले.ही मालिका कलर्स मराठीवर ७ वाजता प्रसारित होत असते.
मालिकेत मुलाने स्वप्नभंग केल्याचा धक्का पल्लवीचे वडील सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी अंथरूण धरलं. वडिलांनी औषधोपचारांना प्रतिसाद द्यावा म्हणून मालिकेतील नायिका पल्लवी देशमाने, त्यांना कलेक्टर होण्याचं वचन देते. पल्लवीची जिद्द आणि परिश्रम बघून आतापर्यंत अंथरुणाला खिळून असलेल्या तिच्या वडिलांची प्रकृती सुधारू लागते आणि घरी आनंदाचं वातावरण होतं. देशमाने कुटुंब हे वणीच्या सप्तशृंगीचे भक्त असल्याने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवस पूर्ण करण्यासाठी वणीला जायचं ठरवतात.
मालिकेची नायिका पल्लवी (नक्षत्रा मेढेकर), आई (लेखा मुकुंद) आणि वाहिनी (पूजा कदम) हे या चित्रीकरणात सहभागी होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने देवीचा आशीर्वाद घेता येईल याचा त्यांना जास्त आनंद होता. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात घामाच्या धारा निघत असतांना देखील कलाकारांनी भाविकांसोबत सप्तशृंगी मातेचा गजर करत वणीचा गड चढला, शिवाय देवीची यथासांग आरती केली. तेथील भक्तीपूर्ण वातावरणाने कलाकार भारावून गेले.