जहांगीरमध्ये ९ ते १५ जूनदरम्यान प्रदर्शन
मुंबईस्थित सुप्रसिद्ध कलाकार स्मिता किंकळे यांचं ‘निओ नेचर’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत दिनांक ९ ते १५ जून २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
स्मिता किंकळे यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या या कलाकृतीं म्हणजे त्यांच्या कलागुणांचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. अंतरंगातील अनेक सुप्त घडामोडींना मुर्त रुप देण्याचा हा एक स्तूत्य प्रयत्न आहे. ग्रामिण तसंच मुख्यत: आदीवासी भागात मुळधरून असलेल्या चित्रकर्तीच्या मनोधारणेला दृष्य रुप देताना नव्या जाणीवा रसिकांपर्यत पोहोचवण्याचा उद्देश या कलाकृतींमागे आहे.
या जगात सामावलेली अनेक जगं या कलाकृतींमध्ये अनुभवायला मिळतात. शहर, बाहुलीचं जादुयी घर, अनेक बंद आणि उघड्या खिडक्या अशा अनेक कलाकृती, निळा, गुलाबी, हिरवा, जांभळा अशा रंगातील प्लास्टीकच्या तुकड्यांचा वापर करून साकार झाल्या आहेत. या कलाकृती पाहताना आपण विस्मित होवून जातो.
आदिवासी जगतात मुळ धारण केलेली दिसणारी ही कला व्दीमितीच्या स्वरुपात पाहताना रंग, रेषा, टींब, अनेक आकार यांचा विणलेला गोफ आपल्याला अवकाशीय दुनियेत घेवून जातो. वनदुनियेच्या या सफरीला आपण अवश्य फेरफटका मारावा.