मराठी सिनेकलावंतांच्या उपस्थितीत १ जुलैला होणार उदघाटन
चित्रपटांचे निर्माते–दिग्दर्शक तसेच सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश भेंडे यांच्या ‘पास्ट’ प्रेझेंट आणि फ्युचर’ या शीर्षकांतर्गत अलौकिक विविध चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कलादालनाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मीनाक्षी पाटील (माजी राज्यमंत्री), सुभाष प्रभाकर पाटील (आमदार), श्रीमती चित्रा आस्वाद पाटील (अध्यक्ष – वर्क्स अँड फायनॅन्स डिपार्टमेंट, रायगड) यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी अभिनेत्री सुलोचना, मृणाल कुलकर्णी, वर्षा उसगावकर, अभिनेते रमेश देव, विक्रम गोखले, रणजीत, अजिंक्य देव, गायिका वैशाली सामंत, सुदेश भोसले यांच्यासहित चित्रपट व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन रसिकांना दि. १ जुलै ते ७ जुलै या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येणार आहे. चित्रकार प्रकाश भेंडे यांनी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षात विविध विषयांवर रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे.
“भालू”, “प्रेमासाठी वाट्टेल ते”, “चटक चाँदनी”, “आपण यांना पाहीलंत का”, “आई थोर तुझे उपकार” या यशस्वी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे भेंडे यांनी
समकालीन कलाक्षेत्रे व सिनेजगतात प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या विविधांगी कलाकृतीतून तसेच रसिकमान्य चित्रमाध्यमातून जनमानसात नावलौकिक मिळवणारे प्रकाश भेंडे मूळचे टेक्सटाइल डिझाईनर आहेत. कला सौन्दर्यदृष्टी, तीव्र आकलनशक्ति या कलागुणांच्या बळावर विविध कलाविष्कारातून आपल्या अंगी असणार्या नैपुण्याचे एक नयनरम्य व मनोहर सादरीकरण करून वेळोवेळी रसिकांची वाहवा व प्रशंसा त्यांनी मिळवली आहे. त्यांचा मूळचा पिंड कलाकाराचा असल्याने अनेक वैश्विक चमत्कार, निसर्ग प्रकृती, स्त्री सौन्दर्य व तिचे विविध भावनिक पैलू, आपली संस्कृति व परंपरा वगैरे ठळकपणे दर्शवणारी त्यांची अद्भुतरम्य व मनोवेधक चित्रे तैलरंग व अक्रिलिक रंगलेपनातून वास्तववादी, मूर्त, अमूर्त व निम्न वास्तववादी अशा अनेक पैलूनी नटलेली आहेत.
अजंठा व एलोरा येथील गुहेतील असणारी प्राचीन संस्कृती दर्शक अशी अलौकिक शिल्पकला व तिची विविध रुपे यावर आधारित त्यांची “अनसेंट वॉल” सिरीज प्रशंसनीय आहेत. त्यातील फ्रेस्को तंत्रावर आधारित ‘पद्मपाणी’, ‘वज्रपाणी’, ‘डिवाईन त्रिमूर्ती’, ‘अभिषेक’, ‘वैश्विक नर्तकी’, ‘मेलोडीअस ब्लेस्सिंग्स’, ‘स्पिरीच्युअल लाइफ’, ‘डिवाईन ब्युटी’, ‘माया’ वगैरे चित्रे अविस्मरणीय आहेत.
त्यांनी सादर केलेल्या ‘सोल ब्रिदिंग” सिरीजमधील “ब्युटी इन द ब्लूम”, “ब्रीझ ऑफ जोय”, “इन सर्च ऑफ पास्ट”, सोल प्यूरिटी”, “इन द वोम्ब”, “मेरीगोल्ड ब्युटी” ही भावोत्कट व परिणामकारक चित्रे संवेदनाशील स्त्रीचे भावविश्व व त्यातील अनेक पैलू साकारणारी आहेत. ठळक व उत्तेजक पण विषयास अनुरूप असे रंग व शक्तीशाली कुंचल्यातील विविध फटकार्यातून कलात्मकतेने साकारलेल्या “एक्सप्लोर” या सिरीजमधील त्यांची “अचीवमेंट”, “पॅराडाईस रेस”, “फाइव स्टार रेस”, “स्विंग मूड” ही चित्रे अनेक घोडे, त्यांची मानसिकता, शौर्य व शक्ती तसेच त्यांचे भावविश्व यथार्थतेने दर्शवितात. काही कालावधी नंतर त्यांनी निर्मिलेली अमूर्त शैलीतील “इन्फिनिटी अबस्ट्रॅक्ट” सिरीजमधील ‘माइंड ब्लौइंग’, ‘ट्यून ऑफ इन्फिनिटी’, ‘मान्सून फ्लॉवर’, ‘होरीझोन’, ‘कॉस्मिक मिरकल’, ‘टायगर’, ‘लस्ट’ ही चित्रे आपल्या अप्रतिम रंग लेखनातून व कलात्मक अभिव्यक्तित्वामुळे विश्वातील दैवी चमत्कारांचे व अनन्यसाधारण कलाविष्कारांचे अनोखे दर्शन रसिकांना घडवतात.
विविधांगी आविष्कारांनी व त्यातील कलात्मक पैलुंनी नटलेली ‘भूत, भविष्य आणि वर्तमान’ काळातील ही कलारूपे प्रकाश भेंडे यांनी आपल्या चित्र प्रदर्शनात सादर करून सर्व रसिक व कलाप्रेमींशी जणू सुसंवाद साधला आहे. सिनेजगत व विद्यमान कलाक्षेत्र या बहूआयामी क्षेत्रात आपल्या अलौकिक कलासादरीकरणामुळे नावलौकिक मिळवणारे प्रकाश भेंडे यांचे हे कला प्रदर्शन कलारसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.