तारा अलीशा बेरीने केले कलाकारांचे कौतुक
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे मराठी रंगभूमीवर गाजलेले आणि गाजत असलेले नाटक तेलगु अभिनेत्री तारा अलीशा बेरीने २९ जूनला शिवाजी मंदिरात बघितले.
सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोही जलसाच्या सहकार्याने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव दिग्दर्शित आणि भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेल्या “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकाचे तब्बल ३५०हून अधिक प्रयोग रंगभूमीवर गाजले असून, अनेक पुरस्कारांवर या नाटकाने आपली मोहोर उमटवली आहे. २९ जून रोजी शिवाजी नाट्यमंदिर येथे अनेक दिवसानंतर या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. आजवर अनेक तेलगु तसेच हिंदी सिनेमांमध्ये झळकणा-या अभिनेत्री तारा अलीशा बेरी, वेशभूषाकार चांदनी साहू आणि दिग्दर्शक अभिक भानू यांची या नाटकाला विशेष उपस्थिती लाभली होती. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या नाटकाचा विषय मनाला भिडणारा असून, कलाकारांचा अभिनयही उत्तम असल्याचे मत याप्रसंगी अभिनेत्री तारा अलीशा बेरी यांनी व्यक्त केले.
आजवर अनेकांनी या नाटकाचा गौरव कला आहे. “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” हे नाटक खरा शिवाजी हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे, समाजाचे किवा प्रांताचे नसून ते कष्टकर्त्याचे, पिडितांचे आणि शोषितांचा व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगणा-यांचे होते. राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे, असा गौरव या नाटकाबद्दल जाणकार व्यक्त करतात.