आषाढी एकादशीनिमित्त खास टेलिव्हिजन प्रीमिअर
आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रीमिअर झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रविवारी १९ जुलैला दुपारी १२ वाजता व सायं ६.३० वाजता आणि २६ जुलैला दुपारी १२ वाजता हा चित्रपट प्रक्षेपित होणार आहे.
पंढरपूरवारीच्या भक्तीमय जल्लोषाला सुरवात झाली आहे. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने वारक-यांची पावलं पंढरीच्या दिशेने पडू लागली आहेत. वारीचा हाच जल्लोष प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळावा यासाठी आषाढी एकादशीचं औचित्य साधत झी टॉकीज ही विशेष भेट प्रेक्षकांना देणार आहे. वारीचा भक्तीमय सोहळा व लहानग्यांचं निरागस भावविश्व याचं दर्शन ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातून घेता येईल.
ज्ञान्या म्हणजेच ज्ञानेश व झेंडु म्हणजेच मुक्ता या दोन भावंडांच्या एलिझाबेथ नावाच्या सायकलविषयीच्या प्रेमाची ही कथा आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या आईला मदत व्हावी आणि तिच्यावर एलिझाबेथला विकण्याची पाळी येऊ नये यासाठी मुलांनी केलेले मनापासूनचे प्रयत्न चित्रपटात मांडण्यात आले आहेत. संत परंपरेतील वैशिष्टय़े आणि त्याच्या जोडीला न्युटन-आईन्स्टाईनचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान अशी आध्यात्म आणि विज्ञानाची उत्कृष्ट सांगड यात पाहायला मिळेल.
पंढरपूरात चित्रित झालेला ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा आपण पंढरपूरात आहोत असचं भासवतो आणि सोबत विठू माउलींच दर्शनही घडवतो. श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, नंदिता धुरी, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर, चैतन्य बडवे, दुर्गेश बडवे महाजन, चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर, अनिल कांबळे यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.