आर्ट ऍन्ड सोल गॅलरीत चित्रप्रदर्शन सुरु
कोकणातील सह्याद्री स्कुल ऑफ आर्टच्या करण शेट्ये, आरती होडे, कश्मीरी राऊळ, मकरंद राणे, श्रीकांत कांबळे, श्वेता उरणे, सुरज दहिवलकर, वैभव निर्मल आणि बिक्रांत बोठारे या नऊ विद्यार्थी कलाकारांचं ‘रायझिंग होरायझन’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात आलं आहे. सदर प्रदर्शन आर्ट ऍन्ड सोल गॅलरी, १ माधुली, शिवसागर इस्टेट, नेहरु तारांगणच्या समोर, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई येथे दिनांक १३ ते १८ जुलै या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
वर्षा कराळे यांनी आयोजित केलेल्या सदर प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉ. संजय देशमूख यांच्या हस्ते १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून आर्ट गॅलरीच्या संचालिका तराना खुबचंदानी प्रमूख पाहूण्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
करण शेट्ये, आरती होडे, कश्मीरी राऊळ, मकरंद राणे, श्रीकांत कांबळे, श्वेता उरणे, सुरज दहिवलकर, वैभव निर्मल आणि बिक्रांत बोठारे या नऊ कलाकारांनी या प्रदर्शनात आपली कला पेश केली आहे. अशा कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुंबईमधल्या या प्रसिद्ध गॅलरीचं व्यासपीठ गॅलरीच्या संचालिका तराना खुबचंदानी यांनी उलब्ध करून दिलं आहे.
रत्नागिरीच्या सह्याद्री स्कुल ऑफ आर्टच्या निवडक नऊ विद्यार्थ्यानी विविध रंगछटांनीयुक्त अशी मुर्त, अमुर्त आणि अर्धमुर्त शैलीमधील विविध रंगातील अनेक चित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. या उभरत्या कलाकारांनी साकार केलेल्या चित्रांमध्ये रंगवैविध्य आणि नवकल्पना त्यांच्या मिलाफ झाला आहे. रत्नागिरीसारख्या कोकणच्या भूमीमधल्या या उभरत्या कलाकारांच्या कलाकृतींना मुंबईकर कलारसिकांनी शाब्बासकीची दाद द्यावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.