सिमरोझा आर्ट गॅलरीत चित्र-शिल्प प्रदर्शन सुरु
सहा सुप्रसिद्ध कलाकारांचं ‘मेटाफोरफोसिस’ हे चित्र-शिल्प प्रदर्शन मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२ भुलाभाई देसाई रोड, ब्रिज कॅन्डी इस्पितळाजवळ, मुंबई येथे २० जुलैपासून सुरु झाले असून ते ३१ जुलै पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे. सिमरोझा आर्ट गॅलरी आणि आर्टक्वेस्ट आर्ट गॅलरी यांच्या सयुक्तविद्यमाने हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
सुकुमार के, स्टॅलिन जोसेफ, के वी एस प्रसाद, रमेश थोरात, सुमंतो चौधरी आणि आसिफ हुसेन या सहा कलाकारांच्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. एकाच कलादालनात सहा प्रथितयश कलाकारांच्या कलाकृतींचा आनंद कलारसिकांना इथे घेता येईल.
आंध्रपदेशचे सुकुमार के यांनी भारतीय महाकाव्यातील व्यक्तिरेखा आपल्या कुंचल्याच्या सहायाने जीवंत केल्या आहेत. स्टॅलिन जोसेफ हे सुद्धा आंध्रपदेशचे असून त्यांच्या कलाकृतींमध्ये मुळ डिजाइन आणि त्याचे रूप, रंग आणि संरचना यांचा प्रमुख रंग सिद्धांताबरोबर झालेला विकास पहायला मिळतो. के वी एस प्रसाद आंध्रच्या एका गावातून उदयाला आले असून भारतीय गांवाचं संवेदनशील आणि सुखद निसार्गचित्र, त्याचं प्रतिक म्हणून चित्रीत केलेली सुंदर तरुणी हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
पुण्याचे रमेश थोरात मुंबईत सेटवरची चित्रं चित्रीत करायला लागले आणि त्याच माध्यमातून त्यानी आपलं काम सुरू केलं, पण कलेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा पुण्याला जावून चित्रकारीतेला वाहून घेतलं. विवाहाच्या चालीरितीमध्ये असलेल्या गोंधळ आणि जागरणाची पुर्ण मलिका चारकोल आणि एक्रिलिकच्या सहायाने साकारून त्यानी तो माहोल उभा केला आहे.
सुमंतो चौधरी हे हैदराबाद येथील असून निसर्ग आणि खेडेगावाच्या स्थापत्य कलेने त्यांना आकृष्ट केलं आहे. रंगीत पेंसिल, पेन, जलरंग, एक्रिलिक रंग आणि मिश्र माध्यमाचा उपयोग करून त्यानी आपली चित्रं साकार केली आहेत. आसिफ हुसेन कोलकाताचे रहिवासी आहेत. त्यांच्या चित्रांमधून मुख्यतः जीवन आणि भारतीय संस्कृति यांच्या जीवंत रंगावर लक्ष केन्द्रित केलं आहे. कॅनव्हासवर चित्रीत केलेली त्यांची अप्रतिम चित्रं भारतीय संकृती आणि एकात्मकतेचं प्रतिक आहेत.
गेली ४४ वर्षं सिमरोझा आर्ट गॅलरी विविध कलाकृतिंची प्रदर्शनं मांडत असून गॅलरीने चित्रकला, छायाचित्रं, शिल्पकला, प्रिंट आणि मातीची भांडी बनवणार्या कलाकारांना सतत प्रोत्साहन देऊन त्यांना एक व्यासपीठ प्रदान केलं आहे.