आत्मविश्वासाचं ‘घर’ सजवणारी प्रेरणा
आयुष्य हे स्वप्नांनी विणलेलं असतं. स्वप्नं पहायची आणि ती साकार करण्यासाठी संघर्ष करायचा. त्यात येणाऱ्या आव्हानांचा डोंगर पार करत धावत राहायचं. अशाच स्वप्नाच्या पूर्ततेसाठी लढणाऱ्या एका जोडप्याच्या वेगवान प्रवासाची गोष्ट म्हणजे ‘डबलसीट’. त्या दोघांची गोष्ट फक्त वेगवानच नाही तर ती आत्मविश्वासाचं ‘घर’ सजवणारी प्रेरणा आहे.
चित्रपट सुरु होतो एका नवदाम्पत्याच्या मधुचंद्राने. परत येतात लालबागमधील जुन्या चाळीतील घरात. अर्थात भरल्या घरात आणि दरातही त्यांना एकांत कसा मिळणार? हा प्रश्न चटकन डोकावतो. त्यातही ते जगण्याचा आनंद साजरा करतात. त्यातल्या गमती जमती सांगत हा चित्रपट पुढे सरकतो. या नवदाम्पत्याची भूमिका अंकुश चौधरी (अमित) आणि मुक्ता बर्वे (मंजिरी) यांनी जबरदस्त साकारली आहे! अभिनयात ‘बाप’ असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
अमित हा कुरीअर कंपनीत काम करणारा आणि मंजिरी खाजगी विमा कंपनीत काम करणारी. या दोघांची स्वप्न खुप छोटी छोटी आहेत आणि आपल्या या आयुष्यात ते आनंदीही आहेत. चाळीतील छोट्याशा घरात एकत्र कुटुंबात मंजिरी आणि अमित आनंदी असले तरी त्यांना हव्या असलेल्या ‘स्पेस’ची उणिव जाणवतेय. ज्यामुळे दोघांची एक विचित्र घुसमट सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अमित नवं घर घेण्याचं स्वप्नं बघतो आणि मंजिरीसहित घरातील सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि इथून सुरू होतो प्रवास त्याच्या मेहनतीचा. हे स्वप्न पूर्ण करतांना त्याला कोणते अडथळे येतात? त्यांच्या मदतीला कोण धावून येतं? या संघर्षात त्याचा विजय होतो का? या सर्वाची गोष्ट म्हणजे ‘डबल सीट’ हा चित्रपट.
हा चित्रपट फक्त घर विकत घेण्यासाठीच्या संघर्षापुरता मर्यादित राहत नाही. त्यात घर टिकवण्याचा संघर्ष, चाळीतलं जगणं, टीव्ही मालिकांचं वेड, त्या दोघांच्या नोकरीतील बलस्थानं, त्यातील आव्हानं, रिअल इस्टेटमधील मार्केटिंग, एका खेड्यातून मुंबईत आलेल्या मंजिरीचं आत्मविश्वासाने धावणं या सा-या पार्श्वभूमीचा भक्कम पाया रचून हा चित्रपट आपल्या यशाचं कळस गाठणारा ठरला आहे.
अंकुश आणि मुक्ता यांच्या व्यक्तीरेखेसोबतच अमितच्या वडिलांची भूमिका साकारणारे विद्याधर जोशी आणि अमितच्या आईची भूमिका साकारणा-या वंदना गुप्ते यांनी आपल्या अनुभवी अभिनय सामर्थ्याची ताकत दाखवून या सिनेमाला श्रीमंती बहाल केली आहे. संदीप पाठक आणि पुष्कर श्रोत्री यांनी अंकुशचे मित्र म्हणून वठवलेल्या भूमिका कथा फुलवण्यासाठी मोलाच्य ठरल्या आहेत.
छायालेखक अर्जुन सरोटे यांच्या कॅमेराने मुंबईचा वेगवान प्रवास अचूक टिपला आहे. चित्रपटाचा संगीतसाज उत्तम आहे. त्यासाठी संगीतकार हृषिकेश, सौरभ, जसराज यांचं अभिनंदन केलच पाहिजे. सर्वच गाणी धमाकेदार झाली आहेत. ‘किती सांगायचंय मला’, ‘मोहिनी’, ‘मन शुद्ध तुझे’ ही गाणी चित्रपटाचा ताल आणि ‘डबलसीट’चा तोल सांभाळणारी ठरली आहेत. स्पृहा जोशी, क्षितीज पटवर्धन आणि समिर विद्वांस यांनी ही गाणी लिहिली आहेत.
एकंदर मायानगरी मुंबई शहरातील एका सर्वसामान्य जोडप्याची ही गोष्ट प्रेक्षकांना भुरळ घालणारी आहे. क्षितीज पटवर्धन यांची कथा आणि समीर विद्वांस यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एस्सेल व्हिजनची निर्मिती आहे.
****
डबल सीट
प्रस्तुती : एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमटेड
निर्माते : रणजीत गुगळे आणि अनिश जोग
दिग्दर्शन : समिर विद्वांस
कलाकार : अंकुश चौधरी (अमित नाईक), मुक्ता बर्वे (मंजिरी नाईक), शुभंकर तावडे (अल्पेश नाईक), विद्य़ाधर जोशी (अमितचे बाबा), वंदना गुप्ते (अमितची आई), संदीप पाठक (अमितचा पोलिस मित्र), पुष्कर श्रोत्री (मयुर), आरती वडगबाळकर (मंदा), विकास पाटील (मंदाचा बॉयफ्रेंड)
तंत्रज्ञ
कथा/ पटकथा : क्षितीज पटवर्धन आणि समिर विद्वांस
संवाद : क्षितीज पटवर्धन
छायालेखन : अर्जुन सरोटे
संकलन : चारू श्री रॉय
संगीत : हृषिकेश, सौरभ, जसराज
गीतकार : स्पृहा जोशी, क्षितीज पटवर्धन आणि समिर विद्वांस
कला दिग्दर्शन : सिद्धार्थ तातोसकर
वेशभूषा : कल्याणी कुलकर्णी–गुगळे
रंगभूषा : संतोष गायके