लवकरच रसिकांच्या भेटीला येणार ‘दुर्गा’
यशस्वी सिनेमाची निर्मिती मूल्य जाणून आणि प्रेक्षकांची अचूक नस ओळखून सिनेमा निर्माण करणारे निर्माते होली बेसिल प्रॉडक्शन हाउसचे विवेक कजारिया यांनी ‘दुर्गा’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
‘फॅण्ड्री’, ‘सिद्धांत’ या प्रदर्शित झालेल्या तर आगामी ‘चौर्य’, ‘एक नं’, राक्षस या सिनेमांची त्यांनी नवलखा आर्ट्ससोबत उत्कृष्ट निर्मिती केली आहे. नेहमीच वेगळ्या प्रयत्नात असणा-या विवेक कजारिया यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. ‘दुर्गा’ या लघुपटाच्या माध्यमातून आजोबा आणि नातीचे भावविश्व आणि गावातील एका कुशल मुर्तीकार ज्याची दुर्गा देवीवर अढळ श्रद्धा अशा व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला आहे.
‘दुर्गा’ या लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर कोरिया येथे बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा होणार आहे. भारतात होणा-या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाची झलक लवकरंच पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री वीणा जामकर, साची आणि कल्याण चॅटर्जी यांच्या लघुपटात प्रमुख भूमिका आहेत. गेली अनेक वर्ष निर्माता म्हणून अग्रेसर असणा-या विवेक कजारिया यांचा दिग्दर्शक म्हणूनदेखील अनुभव तितकाच संवेदनशील होता.
ते म्हणतात, मी काही काळ कोलकाता मध्ये राहिलो आहे. दुर्गा पूजा जवळून पहिल्या आहेत. नवरात्रीतील त्या दिवसात दुर्गा देवीचा होणारा तो अभूतपूर्व सोहळा असतो. या क्षेत्रात माझ्या येण्याचा उद्देश हा फक्त उत्तम सिनेमे बनवण्याचा होता. जे माझं पॅशन आहे. गेली अनेक वर्ष निर्मिती क्षेत्रात काम करत असल्याने ब-याच गोष्टी शिकत गेलो. दिग्दर्शनाच्या माधमातून काही रोजच्या जीवनातील गोष्टी नव्या रुपात दाखवू शकतो हा विचार मी या लघुपटाच्या निमित्ताने मांडला आहे. दिग्दर्शनात येण्याची मिळालेली ही संधी नक्कीच माझ्यासाठी विशेष असेल.