राशिद खान व सुचिस्मिता यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान व युवा गायिका सुचिस्मिता हे दोघे ‘ट्रेडीशन’ या शास्त्रीय संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. २५ सप्टेंबरला २०१५ रोजी मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे.
तमाम शास्त्रीय गायनाच्या रसिकांसाठी २५ सप्टेंबरला पर्वणीचा योग येत आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील अग्रणी राशिद खान व तरूण गायिका सुचिस्मिता ही द्वयी पारंपरिक शास्त्रीय गायनाचा नजराणा पेश करणार आहेत. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सायंकाळी सात वाजता ही मैफल भरेल. ‘इव्हेंट कंपनी’ आणि ‘जिंजर पीआर’ यांच्यावतीने आयोजन केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला ‘एसबीआय म्युच्युअल फंड’ सादर करणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने कार्यक्रमास सहकार्य केले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन प्रकार हा जगातील सर्वात जुना आणि पारंपारिक असा गायनाचा प्रकार आहे.
शब्द व सूरावरची हुकुमत, आवाजातील लहेजा, तालबद्धता आणि घोटून केलेला रियाझ, या ‘संपत्ती’वर भारतीय कलाकार अनादी काळापासून शास्त्रीय गायनाच्या वैभवाला उत्तरोत्तर झळाळी देत आले आहेत. याच मुशीत घडलेल्या राशिद खान व सुचिस्मिता यांनी शास्त्रीय गायनात आपल्या अदाकारानी चार चाँद लावले आहेत.
वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी म्हणजे खेळण्यांशी खेळायच्या वयात शुश्मिता यांची शास्त्रीय गायनाशी ‘गट्टी’ जमली. या वयात त्यांना उस्ताद बडे गुलाम अलि खाँ यांच्या गायनाने आकृष्ट केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय गायनाचे रितसर धडे गिरवणे सुरू केले. कोलकाता येथील प्रख्यात ‘संगीत रिसर्च अॅकेडमी’तून शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘शादी के साईड इफेक्ट’ या चित्रपटात प्रितम यांनी रचलेल्या ‘देसी रोमान्स’ या गाण्याच्या आला स्वरसाज दिला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘लक्ष्मी’ या चित्रपटासाठीही त्यांनी पार्श्वगायन केले आहे. महान संगीतकार ए.आर. रेहमान यांनी ‘एमटीव्ही कोक सेशन ३‘मध्ये सुचिस्मिता यांना खास द्वंद गीतासाठी आमंत्रित केले होते. २५ तारखेला त्यांच्या स्वरसाजाला अजय जोगळेकर- हार्मोनियम, दिलशाद गान-सारंगी आणि ओजस अधिया तबल्यावर साथ देतील. शास्त्रीय गायनाला जगभरात नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचे योगदान असणारे राशिद खानही रसिकांची सायंकाळ यादगार बनवतील.
राशिद खान यांचा गायनाचा प्रवासी लवकरच सुरू झाला. १९७७ साली म्हणजे ११ व्या वर्षी त्यांनी पहिली अदाकारी पेश केली. १९७९ साली नवी दिल्लीत त्यांनी ‘आयटीसी संगीत संमेलना’त कला सादर केली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. विविध मैफली’ सांगितिक कार्यक्रमातून देश आणि परदेशात त्यांचे सूर गुंजत राहिले. शास्त्रीय गायनातील रागदारीचा जो विस्तार असतो त्याचा परिपोष करण्यात ते माहीर मानले जातात.
अधिक माहितीसाठी नेहरू सेंटर, वरळी- २४९६४६८० येथे संपर्क साधावा.