राजवाडे अॅन्ड सन्स ****
श्रीमंती किती, कशी असावी आणि त्या गर्भश्रीमंतीचा डोलारा कसा जोपासावा हे जाणून घ्यायचे असेल तर ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ हा मराठी सिनेमा बघितलाच पाहिजे. श्रीमंती असली की त्याचा आब राखण्यासाठी मोठेपणाही जपावाच लागतो. त्यासाठी वेगवेगळे निर्बंधही पाळावेच लागतात. ते निर्बंध कुणासाठी असतात? त्यातून कोण कसा मार्ग काढतो? हे पाहत असताना अनपेक्षितपणे हा चित्रपट आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीवर, श्रीमंतीच्या आड दडलेल्या घमंडीपणावर टोकदार भाष्यही करून जातो.
तसा हा चित्रपट म्हणजे एका गर्भश्रीमंत कुटुंबाचीच गोष्ट आहे. सामान्य लोकांचे जगणे या चित्रपटाच्या श्रीमंतीशी तोलायला गेलोत तर पासंगालाही पुरणार नाही. तरीही हा चित्रपट सर्वस्तरातील रसिकांना आवडेल. त्या श्रीमंतीपेक्षा आपल्या घरकुलातील सर्व सदस्यांना मिळणारे स्वातंत्र्य आपल्याला मोठे वाटेल. सर्वच गोष्टी पैशाने विकत मिळत नसतात. आनंद मिळवण्यासाठी मनासारखे जगायला मिळाले पाहिजे, ही अपेक्षा असते. मात्र राजवाडेच्या बंगल्यात या अपेक्षांचा कसा कोंडमारा होतो, हे जाणून घेतले पाहिजे.
सिनेमाची गोष्ट पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यावसायिक राजवाडे कुटुंबाची आहे. रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना विद्याधर (सचिन खेडेकर), शुभंकर (अतुल कुलकर्णी), विक्रम (अमित्रीयान पाटील) ही तीन मुले आणि लक्ष्मी (मृणाल कुलकर्णी) ही मुलगी आहे. यातील विक्रम लहान असतानाच घरातून निघून गेलेला असतो. त्याचे शल्य बोचत असलेली आई सुशीला राजवाडे (ज्योती सुभाष) अशा या कुटुंबातील सदस्यांची ओळख क्रमाक्रमाने होत जाते. एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले आहे पण तिचा पतीही घरजावई म्हणून राजवाडे कुटुंबात आहे. विद्याधर, लक्ष्मीची मुलं-मुली वयात आलेली आहेत. तिसर्या पिढीत शुभंकरची मुलगी सर्वात लहान आहे. तिला आई नाही. तिचा मृत्यू झाला, कशाने? हे चित्रपटभर शोधावे लागणार आहे. उत्तर सापडले नाही तर फार मनाला लावून घ्यायचे नाही. मोठ्या मोठ्या घरात अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात.
असे हे भरले कुटुंब पुण्यातील जुन्या वस्तीतील वाड्यातून पुण्याच्या जरा बाहेत असणार्या नव्या वस्तीतील आलीशान बंगल्यात शिफ्ट होत आहे. पहिल्यांदा या शिफ्टिंगचे काम सुरू असणारी दृश्ये नजरेसमोर येतात. जुन्या वाड्यात असणार्या काही जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावून, जाळून नष्ट करण्याचे काम सुरू दिसते. त्यात सापडणार्या वस्तु चित्रपटातील पुढच्या प्रवासाला जोडण्याचे काम उत्तम झाले आहे.
जुन्या वाड्यातून हे कुटुंब नव्या वस्तीत येते. वाड्यातील सार्या आठवणी कुरवाळत चित्रपट पुढे सरकायला लागतो आणि लहानपणी घरातून निघून गेलेला विक्रम एक दिवस या कुटुंबात परत येतो. तो आल्यानंतर पुढे काय होते ते बघायला चित्रपटगृह गाठले पाहिजे.
राजवाडे या कुटुंबाची तिसरी पिढी आणि जुनी पिढी यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारी ही गोष्ट आहे. कुटुंबप्रमुख म्हणतील तसेच जगाचे हा या कुटुंबाचा अलिखित नियम आहे. तिसर्या पिढीला हा कोंडमारा सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. हा कोंडमारा या कुटुंबातील पुरुष कसे सहन करतात आणि स्त्रियांच्या वाट्याला काय येते, यावर परिणामकारक भाष्य ‘राजवाडे अँड सन्स’मध्ये आहे.
सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, अमित्रीयान पाटील, मृणाल कुलकर्णी यांच्यासह पौर्णिमा मनोहर (सरिता), राहुल मेहेंदळे (वैभव), अलोक राजवाडे (अनय), सिद्धार्थ मेनन (विराजस), मृण्मयी गोडबोले (अनन्या ), कृतिका देव (श्वेता), सुहानी धडफळे (तन्मया) या सा-यांनी आपापल्या भूमिकांत प्राण ओतला आहे.
दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या सर्वच जबाबदा-या सचिन कुंडलकर यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर भक्कमपणे उचलल्या आहेत. अभिनय, कथा, दिग्दर्शन, संगीत, संवाद, पटकथा, संकलन, छायाचित्रण या सर्वच पातळ्यांवर हा सिनेमा मजबूत आहे. राजवाडे सर्वार्थाने गर्भश्रीमंत आहे.
‘राजवाडे अॅन्ड सन्स’ची श्रेयनामावली
निर्मिती : यशवंत देवस्थळी आणि कॅफे कॅमेरा
निर्माते : यशवंत देवस्थळी, अतुल कुलकर्णी, सचिन कुंडलकर
दिग्दर्शन : सचिन कुंडलकर
कथा, पटकथा, संवाद : सचिन कुंडलकर
गीत, कविता : तेजस मोडक
संगीत : देबार्पितो, एड्रियन डिसुझा, तेजस मोडक
पार्श्वसंगीत : देबार्पितो
गायक/ गायिका : शंकर महादेवन, नयनतारा भटकळ, देबार्पितो
कॅमेरामन : अर्जुन सोरटे
संकलन : अभिजीत देशपांडे
कलाकार : सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, अमित्रीयान पाटील, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे, अलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, सुहानी धडफळे