बजाज कलादालनात जलरंगातील चित्रप्रदर्शन
मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार आनंद महाजनी यांनी जलरंगातील पेपरवर काढलेल्या नवनिर्मित आशयपूर्ण चित्रांचे प्रदर्शन नरीमन पॉइंट येथील कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत २६ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
सदर चित्र प्रदर्शनात चित्रकार आनंद महाजनी यांनी नेहमीच्या वास्तु किंवा वस्तु यापूर्वी न पाहिलेल्या त्यांच्या रूपात प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेली २० वर्षे ग्राफिक डिझाईनचा अनुभव गाठीशी असलेल्या आनंद महाजनी यांनी आपल्या व्यस्त व्यावसायिक चक्रव्युहातून वेळ काढून या कलाकृती रसिकांसमोर सादर केल्या आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक ग्रुप व एकल प्रदर्शनातून आपल्या कलेने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.
चित्रकार आनंद महाजनी यांनी आपल्या चित्रप्रदर्शनात देशातील अनेक ऐतिहासिक वास्तूंपासून प्रेरणा घेऊन नव्या दृष्टीकोनातून त्या प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. विविध इमारतीतील रचनात्मक वैशिष्ट्ये आपल्या दिव्य अशा मन:चक्षूच्या माध्यमातील अवलोकनामार्फत जलरंगातून सादर केली आहेत. चित्रातील विविध आकार आणि रचना ह्यांच्यात आवश्यकतेनुसार बदल करून त्या परिवर्तनातून त्यांनी एक अदभूत चित्रखजिना रसिकांपुढे मांडला आहे. चित्रातील पूर्ण संकल्पना न दर्शविता त्यांनी येथे फक्त काही प्रतिकात्मक भाग अतिशय वेगळ्या पण वैशिष्ट्यपूर्ण तर्हेने मूळ स्वरुपातील आशयघनतेसह अनोख्या रीतीने प्रकट केला आहे.
महाजनी म्हणतात, “मी समोरची वास्तु पाहून, अंत:प्रेरणेने त्यातील जे मला भावले ते या चित्रातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्या कला – वस्तूशी हा माझा एक प्रकारचा संवादच असतो, व त्या प्रकटीकरणाचा हा प्रयास आहे. आता माझा हा संवाद त्या वास्तूशी की स्वत:शीच, हे मात्र मला उमजत नाही”.
आपल्या आजूबाजूला ज्या सामान्य वस्तु असतात, त्याहून त्या माझ्या नजरेला निराळ्याच दिसतात. त्या माझ्या डोळ्यासमोर निराळ्याच रूपात येतात. आणि त्यांच्या वास्तविक उपयोगापेक्षा त्या काहीतरी निराळेच अर्थ मला सांगून जातात. त्यात दडलेल्या अदृश्य आकारांनी मी नेहमीच प्रभावित होतो, असे चित्रकार आनंद महाजनी यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा बोलका व कलात्मक आशयघन असा कलाविष्कार कलारसिकांसाठी एक पर्वणीच ठरेल.