समाजासमोर दाहक वास्तव मांडणारा चित्रपट
अन्यायाला वाचा फोडणारा राम-लक्ष्मण प्रॉडक्शन निर्मित ‘धनगरवाडा’ या चित्रपटातून समाजासमोर एक दाहक वास्तव मांडले जाणार असून, हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ६८ वर्षांचा काळ लोटला. विज्ञान-तंत्रज्ञानाने आकाश गाठले. पण जाती-पातीचे राजकारण, रुढी-परंपरांना चिटकलेला, जातपंचायतीसारख्या समांतर न्यायव्यवस्थेला बळी पडलेला धनगर समाज आजही उपेक्षित, दुर्लक्षित आणि सोशिक राहिला आहे. एकेकाळी धनगर समाजात जन्मलेल्या महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवला. पण, होळकर घराण्यातील शुरवीरांचे रक्त वाहत असलेल्या या धनगर समाजाला आज ग्लानी आली आहे. एकूण बावीस पोटजातीत विभागलेला निमभटका धनगर समाज आपल्या शेऴ्यामेंढ्यांसह डोंगरकपा-यांत वास्तव्य करून आहे. परंतु आजही प्रशासन आणि तथाकथित उच्चवर्णीय तसंच सावकारांकडून होणारे अमानवी अत्याचार मेंढरांप्रमाणे मुकाट सहन करीत आहे.
कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. धनगरवाडा हा त्यांचा अभिनय केलेला शेवटचा सिनेमा. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी कठीण परिस्थितीत चित्रीकरण पूर्ण केले. सिनेमाची गोष्ट महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाची आहे.
सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे. यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कारात या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक परिक्षीत भातखंडे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम पदार्पण आदी पुरस्काराने गौरविण्यात आले. गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहीले आहेत.
अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले.
अलका कुबल-आठल्ये – शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा हा सिनेमा २७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. पुढे वर्षभर महाराष्ट्रात आणि सीमाभागातील धनगर समाजाच्या जवळपास सव्वाशे जत्रांमध्ये दाखवला जाणार आहे.