सुप्रसिद्ध रंगलेखक विजय कुमार सोमांची यांच्या चित्रकृतींचं चित्रप्रदर्शन मुंबईत जहांगीर कलादालनात ८ डिसेंबरपासून सुरु झाले असून ते १४ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. बर्फाच्छादीत शिखराचं मनोहारी दर्शन या प्रदर्शनामधून होणार असून हिमाच्छादीत पर्वतांचं गुढ सामोरं पाहण्याची अमुल्य संधी कलारसिकांना प्राप्त होणार आहे.
बर्फाच्छादीत शिखराचं मनोहारी दर्शन
विजय कुमार सोमांची यांच्या कलाकृती जहांगीरमध्ये
भव्य आणि रहस्यमय अशा एका आज्ञात दुनियेचा प्रवास या चित्रप्रदर्शनातून घडणार आहे. रंगलेखकाच्याच शब्दात सांगायचं तर “बर्फाच्छादीत पर्वत हा विषयच सर्वकालिन मानवाला भुरळ पाडणारा असून ते पहात असताना माणूस आपसूकच आध्यात्मिक पातळीवर जाऊन पोहोचतो.” निसर्गाच्या भव्यतेचा साक्षात्कार ही चित्रं पाहाताना आपल्याला येतोच. दगड आणि पर्वताचे उभे कडे चितारताना जवसाचं तेल आणि दिव्याची काजळी यांचा वापर करून अप्रतिम दृष्य परिणाम साधला आहे.
चित्रकार विजय कुमार सोमांची यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून पदवी संपादन केली असून ते डॉक्टरेटसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. ललित कला अकादमी पुरस्कारप्राप्त असा हा चित्रकार राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिक मान्य झाला आहे. चित्रकार विजय कुमार सोमांची यांची चित्रं भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, मॉरिशस अशा अनेक देशातील कलारसिकांच्या संग्रही आहेत.