सात कलाकृतींची अंतिम फेरी २६ डिसेंबरला होणार
‘मानाचि’ने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. यंदाच्या एकांकिका स्पर्धेची दमदार सुरवात झाली असून, या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा ठरला आहे. प्राथमिक फेरीत ३२ एकांकिकांच्या विषयांमधून ७ एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.
राकेश सारंग, गंगाराम गवाणकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मंगेश तेंडूलकर, अरुण नलावडे, सदानंद मोरे, डॉ. गिरीश ओक, राजन खान, खासदार सुप्रिया सुळे, दीपक राजाध्यक्ष, निर्मिती सावंत, चित्रकार वासुदेव कामत, आशुतोष घोरपडे, किशोर कदम, क्रिकेटपटू संदीप पाटील, संजय सोनवणी या मान्यवरांनी दिलेल्या विषयांवर विविध संस्थानी ‘एक से बढकर एक’ एकांकिका सादर केल्या. निवडल्या गेलेल्या ७ एकांकिकांची अंतिम फेरी २६ डिसेंबरला माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे रंगणार आहे.
राजेश देशपांडे, सुहास कामत, सचिन दरेकर आणि मानाचि लेखक संघटनेच्या सदस्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे नव्या कलावंतांच्या कलागुणांना चांगला वाव मिळतो आहे. या उपक्रमामुळे नवे विचार व आजच्या पिढीचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन समजून घेता येत असल्याचं मत राजेश देशपांडे यांनी मांडलं.
अंतिम फेरीत दाखल झालेल्या सात एकांकिका
आकार अकादमी : रिमोट कंट्रोल
पंचम : लव्ह सेक्स धोका
अनामय मुंबई : ओएलएक्स
सकस मुंबई : मुलं आणि टेक्नोसॅव्ही जग
कलासाधना : बधीर जाणीवांचा
ऑन स्टेज : प्रकल्पत्रस्त (घर ते जग)
इम्प्रोव्हायझेशन : ह्यो कोण