शिवदर्शन साबळे व अजित पाटील यांचे निर्मितीत पदार्पण
मराठी चित्रपटसृष्टीत दोन झपाटलेले तरुण शिवदर्शन साबळे आणि अजित पाटील ‘मॅजिक अवर क्रियेशन्स’ व ‘वीर क्रियेशन्स’ या बॅनरखाली ‘लगी तो छगी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू व संगीतकार देवदत्त साबळे यांचे सुपुत्र. शिवदर्शन साबळे यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा संगीताचा वारसा तर घेतलाच आहे त्याशिवाय लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही फार मोठी झेप घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या ‘कॅनव्हास’, ‘रंग मनाचे’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ या चित्रपटातून दिग्दर्शनक्षेत्रातील निपुणता सिद्ध केली आहे. चित्रपटांबरोबरच त्यांनी “परंपरा डॉट कॉम”, “मी आणि ती” व “तळ्यात मळ्यात” या नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करून आपले रंगमंचीय कसब जगाला दाखवून दिले आहे.
गेली अडीच ते तीन वर्ष ते एका चित्रपटाची कथा, पटकथा त्यांचे बंधू हेमराज साबळे यांच्या साथीने लिहीत आहेत. इतक्या वर्षाच्या खडतर परिश्रमातून त्यांचं पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ध्येयवादी चित्रपटाच्या निर्मितीकडे वळवला व त्यासाठी त्यांनी सह निर्मात्यांचा शोध सुरू केला. अशाच एका कथाकथनच्या वेळी अजित पाटील या जुन्या मित्राची भेट झाली. त्यांना या चित्रपटाची कथा खूप आवडली. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या अजित पाटील यांची मराठी चित्रपटाबद्दल असलेली प्रचंड आवड आणि प्रेम हया एकाच भांडवलावर शिवदर्शन साबळे यांच्याशी सुर जुळले आणि त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीस सहकार्य करण्यास होकार दिला.
“मॅजिक अवर क्रियेशन्स” आणि “वीर क्रियेशन्स” या बॅनरखाली बनत असलेल्या “लगी तो छगी” या महत्वाकांक्षी चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद शिवदर्शन साबळे व हेमराज साबळे यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवदर्शन साबळे स्वत: करीत असून चित्रपटाला संगीत देवदत्त साबळे आणि शिवदर्शन साबळे यांनी दिले आहे. यात अभिजीत साटम, अभिजीत गुरु, निकिता नार्वेकर, मिलिंद उके, शैला काणेकर, राजू बावडेकर, चिन्मय पाटसकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात एकूण ७० पात्र व ५२ लोकेशन्स असून या चित्रपटातील संगीताच्या कामास सुरुवात झालेली आहे. चित्रपटाची तीन गाणी तयार आहेत. त्यातलंच ‘लवथवती विक्राळा (आरती) हे गाणं यू ट्यूबवर प्रदर्शित केले असून या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.