मराठी सिनेसृष्टीतील टॉपची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ‘हंटर’ सिनेमाद्वारे बोल्ड सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. आता मराठमोळी सई चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत सई ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकणार आहे.
‘स्लमडॉग मिल्यिनिअर’फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. ‘स्लमडॉग मिल्यिनिअर’ सिनेमाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीने नक्कीच मोठी झेप घेतलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सईच्या सर्व चाहत्यांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सई सध्या जयपूर येथे ‘लव्ह सोनिया’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.