ओम राऊत यांच्या संकल्पनेतील ‘स्वातंत्र्यवीर’
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१ व्या आत्मार्पण स्मृतिवर्षाचे औचित्य साधून सोमवार दि. ९ मे २०१६ रोजी भव्य, नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक, ध्वनिप्रकाश कार्यक्रम (लाईट अँड साऊंड शो) शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित ‘स्वातंत्र्यवीर’ हा भव्य, नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील पहिला आणि सर्वात मोठा कायमस्वरूपी थ्री डी वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित लाईट अँड साऊंड शो असणार आहे. विशेष म्हणजे, कायमस्वरूपी चालणा-या या भव्य ‘लाईट अँड साऊंड शो’मुळे केवळ मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान सन्मानाने उंचावणार आहे.
विषयाचा गाढा अभ्यास आणि संशोधनातून लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करणा-या निवडक दिग्दर्शकांमध्ये ओम राऊत यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या चित्रपटातून त्यांच्या मेहनतीचे आणि अभ्यासूवृत्तीचे दर्शन झाले. लोकमान्य टिळकांचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून मांडणारे ओम राऊत तब्बल दीड वर्षाच्या मेहनतीनंतर आता वेगळ्या ढंगात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची झलक लोकांसमोर सादर करणार आहेत.
स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या, महत्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे सावरकरांवर काहीतरी विशेष करण्याचा आमचा मानस होता, त्यासाठी तरुण, होतकरू दिग्दर्शक ओम राऊत यांच्या सहकार्याने हा विशेष उपक्रम आम्ही हाती घेतला. ओम राऊत यांच्या संकल्पनेतून सादर झालेला हा भव्य लाईट अँड साऊंड शो सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहचविणारी आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे’. असे रणजित सावरकर यांनी सांगितले. तसेच या लाईट अँड साऊंड शो बद्दल बोलताना ओम राऊत यांनी, “स्वातंत्र्यवीर सावरकर ज्वलंत देशप्रेमी, संवेदनशील कवी त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि कलेचा संगम अपरिहार्य होता”, असे सांगितले.
सावरकरांच्या आभासी प्रतिकृतीला वास्तविकतेची झालर येण्यासाठी कमालीचे व्हिज्युअल विथ साऊंड इफेक्ट्स दिले गेल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम मोठी पर्वणीच ठरत आहे. या कार्यक्रमाद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही घटनांची ओळख रसिकानां होईल. रात्री ८ वाजता सुरु होणारा हा कार्यक्रम २० मिनिटाचा असून, त्यासाठी १५० प्रेक्षकांची आसनव्यवस्था स्मारकाच्या प्रांगणात करण्यात आली आहे. या शो साठी १०० रु आणि १५० रु तिकीटदर आकारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित हा भव्य दिव्य उपक्रम उपस्थितांचे डोळे दिपविणारा ठरत असून मुंबईत येणा-या लाखो पर्यटकांसाठी हा ‘लाईट अँड साऊंड शो’ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.