करीयरसाठी कॅमेरामनला दिले १०१ रुपये!
‘लाल इश्क – गुपित आहे साक्षीला’ चित्रपटाची हवा आता सर्व ठिकाणी चांगलीच झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी आता या चित्रपटाचीच चर्चा आहे. तगड्या स्टारकास्टसोबतच या चित्रपटातून एक ग्लॅमरस नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. ती आहे स्नेहा चव्हाण.
या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, जयवंत वाडकर, पीयूष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला हे तगडी स्टारकास्ट आहे.

त्याचे झाले असे की स्वप्नील जोशीने तिला सांगितले की, ‘कॅमेरामनला शकुनाचे १०१ रुपये देऊनच शुटींगला सुरुवात करायची असते. असे केले तरच तुझे करीयर सुपरहिट होईल.’ त्याच्या या सुरात उपस्थित सर्वांनीच सूर मिळवला. त्यांचे हे बोलणे साध्या-भोळ्या स्नेहाला खरेच वाटले आणि ती शॉटच्या आधी कॅमेरामनला १०१ रुपये द्यायला गेली आणि तिला पाठून हसण्याचा जोरजोरात आवाज आला. मागे वळून बघितले तर स्वप्नीलसह सर्वच टीम तिच्याकडे बघून हसत होते. तेव्हा तिला आपली रॅगिंग केल्याचे समजले.
‘हा रॅगिंगचा अनुभव माझ्यासाठी फारच मजेदार होता. या सर्वांसोबत काम करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. अशीच धम्माल आम्हीसुद्धा करायचो’, असे स्नेहाने सांगितले.
भन्साळी प्राॅडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची सहनिर्मिती शबीना खान आहेत. येत्या २७ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.