‘लाल इश्क़’च्या शुटींगदरम्यान अशीही धम्माल!
‘लाल इश्क’ या सिनेमाच्या शुटींगपूर्वी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांना स्वाईन फ्लूची बाधा झाली. त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना खजूर खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शुटींग सुरु झाल्यानंतर त्या खजुराचा डबा घेऊन येत. हा दाबा एक गँग लपवत असे, तर दुसरी गँग त्यांना खजूर देत असे. ही खजूर देणारी गँग म्हणजे स्वप्ना वाघमारे यांची ‘खजूरगँग!
‘लाल इश्क़’ हा सिनेमा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. नेहमीच या सिनेमाशी निगडीत असलेल्या गोष्टी आपल्या कानावर येतचं असतात. संजय लीला भन्साळी यांचा पहिला मराठी सिनेमा म्हणून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्कंठा वाढू लागली आहे. लाल इश्क़ या सिनेमाच्या टीमने शुटींगच्या दरम्यान धमाल मस्ती करत सिनेमा पूर्ण केला. एकत्र काम करत असताना स्वप्ना वाघमारे यांची एक गँग तयार झाली. या गँगचं ‘खजूरगँग’ असं नामकरण करण्यात आलं.
या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी सिनेमाच्या दिग्दर्शिका स्वप्ना यांना स्वाईन फ्लूची बाधा झाली होती. शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी स्वप्ना यांना खजूर खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे सेटवर स्वप्ना खजुराचा डबा घेऊन यायच्या. चित्रीकरण करतेवेळी त्या अधून मधून खजुरही खायच्या. स्वप्ना यांची मस्करी करण्यासाठी स्वप्नील जोशी, पीयूष रानडे हे दोघेही त्यांचा खजुराचा डबा लपवून ठेवत असत. हा डबा शोधताना स्वप्ना कंटाळून जात असत. या सिनेमात काम करणाऱ्या अंजना सुखानी, समिधा गुरु, स्नेहा चव्हाण या तिघींनी यावर उपाय म्हणून खजुराचे डबे आणायचे ठरवले. ज्या ज्यावेळी स्वप्नील आणि पीयूष खजुराचे डबा लपवायचे तेव्हा त्यांचे नवीन डबे बाहेर यायचे. त्यामुळे सेटवर या चौघींना ‘खजूरगँग’ म्हणून संबोधू लागले. यात भर म्हणजे, या चौघींनी ‘खजूरगँग’चा मगदेखील सेटवर लाँज करत आपली महिला युनिटी सिद्ध केली.
भन्साळी प्राॅडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची पटकथा तसेच संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. सहनिर्मिती शबीना खान यांची असून, येत्या २७ मेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.