‘युथ’च्या गाण्याची भन्नाट जादू
सगळ्यांच्याच आयुष्यात येणारे एक वळण म्हणजे प्रेमात पडण्याचा काळ… प्रेक्षकांच्या मनात ते गुलाबी दिवसांतील क्षण जागवले आहे ‘युथ’ चित्रपटातील ‘जे होते मला…’ या गाण्याने!

अरमान मलिकच्या आवाजातील या गाण्याचा ऑडियो रिलीज झाला आणि ‘जे होते मला, होते का तुला’ विचारावेसे वाटणाऱ्या प्रियकराला एक नवे गाणे मिळाले… अरमानच्या आवाजाची जादू सगळ्याचं ह्रदयांवर झाली. तरूणाईच्या ह्रदयाचा ठोका चुकवणाऱ्या या गाण्याचा विडियोही तितकाच भन्नाट आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री नेहा महाजन यांच्यावर चित्रीत हे गाणे… ज्यात नेहाचा अल्लडपणा अक्षयला भावतो आणि यातूनच अक्षयच्या मनात हे प्रेमबंध फुलायला लागतात. या दोन जीवांची घालमेल या गाण्यात उत्कृष्टरीत्या चित्रीत करण्यात आली आहे.

विक्टरी फिल्म्सची प्रस्तुती असणाऱ्या या चित्रपटात नेहा महाजन आणि अक्षय वाघमारेसह अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण असे युवा कलाकार आहेत. त्याशिवाय विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर हे दिग्गजही या चित्रपटात दिसणार आहेत. बदल घडवण्याची ताकद असणारा ‘युथ’ हा सिनेमा येत्या ३ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.