‘अलबेला’ची उत्सुकता वाढली; २४ जूनला चित्रपटगृहांत येणार
आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत रसिकांच्या हृदयात आपले हक्काचे घर बांधणारी विद्या बालन मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीला बऱ्याच गोष्टी बहाल करणारे भगवान दादा यांचा जीवनपट उलगडणारा ‘अलबेला’ हा चित्रपट येत्या २४ जूनला चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. त्यात विद्या बालन ज्येष्ठ अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारत आहे.
चित्रपटातला विद्या बालनचा लूक आऊट झाला आणि खरचं गीता बाली पुन्हा अवतरली की काय? असा भास सगळ्यांनाच झाला. प्रेक्षकांना हा सुखद धक्का देण्याचे श्रेय मेक-अप आर्टीस्ट विद्याधर भट्टे आणि या चित्रपटाच्या वेशभूषाकार सुबर्णा राय चौधरी यांना जाते.
यासंदर्भात बोलताना मेक-अप आर्टीस्ट विद्याधर म्हणाले, ‘चित्रपटात दिसणाऱ्या केशरचनेपूर्वी मी सहा-सात विग्स वापरून पाहिल्या. शिवाय १० केशरचनांचे ट्रायल्स झाले आणि अखेर गीता बाली आणि विद्या यांत साम्य दाखवणारी केशरचना मला मिळाली.’
या चित्रपटाविषयी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावलेली अभिनेत्री विद्या हिला एखादा चांगला मराठी चित्रपट करण्याची बरेच दिवस इच्छा होती. मी या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी तिला फोन केला तेव्हा ती कोचीनमध्ये होती. ती तिथून आल्यावर या चित्रपटाची कथा आम्ही तिला ऐकवली आणि ताबडतोब तिने या चित्रपटासाठी आपला होकार कळवला.’
विद्याधर यांना प्रेक्षकांसमोर विद्याचा नॅचरल लूक आणायचा होता. याबाबत बोलताना, ‘विद्याने कधीही माझ्या कामात दखल दिली नसल्याचे’ त्यांनी सांगितले. काळ बदलतो तशी स्टाइलही बदलत जाते. आज असणारी कपड्यांची स्टाइल १०५०च्या दशकांत फार वेगळी होती. आजच्या काळात तसाच लूक डिझाइन करणे हे डिझायनर्ससाठी एक मोठे आव्हान होते. हे आव्हान लिलया पेलले या चित्रपटाच्या डिझायनर सुबर्णा राय चौधरी यांनी. त्यांनी या आव्हानात्मक कामाचा अवघ्या सहा दिवसांत फडशा पाडला.
चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनिंगविषयी बोलताना सुबर्णा राय चौधरी म्हणाल्या, ‘निर्मिती संस्थेने खूप विश्वासाने हे काम माझ्याकडे सोपवले होते. विद्या बालन पडद्यावर गीता बाली दिसावी यासाठी सुबर्णा यांनी त्या काळातल्या ड्रेसेसचा अभ्यास केला… चित्रपटाचा काळ उभारणे हे मोठे कसब होते मात्र आम्ही त्या काळातल्या ड्रेसेसेबरोबरच, दागिन्यांचा अभ्यास करून एक संपूर्ण लूक डिझाइन केला.
अशा या विद्याच्या लूकसाठी फक्त काही दिवस वाट पहावी लागणार आहे. दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित ‘एक अलबेला’ येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.