दिग्दर्शनाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पाऊल
‘आकडा’ ही गाजलेली एकांकिका, ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकातून रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवल्यानंतर लेखक आणि अभिनेते राजकुमार तांगडे आता चित्रपटाकडे वळले आहेत. ‘चिवटी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.
सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून राजकुमार तांगडे यांची ओळख आहे. त्यांनी केलेल्या कलाकृतीतूनही सामाजिक, राजकीय समज दिसली आहे. आता त्यापुढे पाऊल टाकत ते चित्रपटाकडे वळले आहेत.
साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे का आणि त्यामागे होणारं राजकारण असं वेगळ्याच धाडणीचं कथानक घेऊन ते ‘चिवटी’ हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद याचं लेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच बीड इथं झाला. चित्रपटाचं चित्रीकरण बीड, जालना आणि महाबळेश्वर इथं केलं जाणार आहे.
प्रगती चित्र संस्थेच्या अजिनाथ ढाकणे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे, अशोक देवकर, देवकी खरात आणि किशोर उढाण आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. देवेंद्र गोलतकर छायालेखन करत असून, भगवान मेदनकर कार्यकारी निर्माते आहेत.
जालन्यासारख्या भागात नाटकाचं वातावरण तयार करण्यात राजकुमार यांचा मोठा वाटा आहे. आकडा या एकांकिकेतून त्यांनी वीजचोरीचा प्रश्न हाताळला होता, तर ‘शिवाजी अंडरग्राउंड..’च्या माध्यमातून सध्याची सामाजिक परिस्थिती परखडपणे मांडली होती. त्यांनी रंगभूमीवर केलेल्या कामाचं कौतुक झालं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून काय वेगळं भाष्य करतात, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.