संजय जाधवची नवी मालिका ३० मेपासून स्टार प्रवाहवर
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या घवघवीत यशानंतर संजय जाधव पुन्हा एकदा ‘दुहेरी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा असलेल्या या मालिकेचे कथानक एक बहीण आपल्या बहिणीवर आलेल्या संकटावर मात करीत स्वत:ची ओळख विसरून कसे दुहेरी आयुष्य जगते यावर आधारित आहे.
‘दिल दोस्ती दोस्ती दुनियादारी’सारख्या धमाल मालिकेनंतर संजय जाधव हे स्टार प्रवाह वाहिनीवर दुहेरी मालिकेच्या रुपात एक दमदार थ्रिलर छोट्या पडद्यावर आणली आहे.
मालिकेची संकल्पना जितकी उत्तम आहे तितकीच त्यातील स्टार कास्टदेखील जबरदस्त आहे. उर्मिला निंबाळकर ही या मालिकेत प्रमुख आणि दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे तसेच तिच्या लहान बहिणीची भूमिका केली आहे अमृता पवारने. आतापर्यंत आपण ज्यांना विनोदी भूमिका उत्तमरित्या वठवताना पहिले आहे असे अभिनेता सुनील तावडे यात ‘परसू’ नामक खलनायकाच्या भूमिकेत सगळ्यांना थक्क करतील यात शंकाच नाही.याशिवाय निवेदिता सराफ, तुषार दळवी, रवींद्र महाजनी असे दिग्गज कलाकार आपल्याला या मालिकेतून एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.
कौटुंबिक, प्रेम कहानी मालिकेनंतर रहस्यमय मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल आणि मनोरंजनही करेल हे मात्र नक्की आहे.कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक मालिका ‘दुहेरी’ प्रेक्षक पाहू शकणार आहेत ३० मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह एचडीवर.