‘बर्नी’ १७ जूनला प्रदर्शित होणार
तेजस्विनी लोणारी ‘बर्नी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याच भूमिकेसाठी तिला तब्बल १५ किलो वजन घटवावे लागलेले आहे.
एखाद्या चित्रपटासाठी वजन वाढवणे किंवा कमी करणे हा प्रकार तसा नवीन नाही. कित्येक कलाकारांनी आपल्या भूमिकेसाठी तसा प्रयोग केलेला आहे. आता त्या यादीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या नावाचाही समावेश झाला आहे.
शिवलीला फिल्म्स निर्मित ‘बर्नी’ चित्रपट १७ जूनला प्रदर्शित होणार आहे. तेजस्विनी लोणारी म्हणाली की, ‘बर्नी’ चित्रपटात किशोरवयीन दिसण्यासाठी वजन कमी करावे लागले. या चित्रपटात १९७० काळ दाखवल्यामुळे त्या काळात जिम व व्यायामाची शरीरयष्टी दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे काटक दिसण्यासाठी व्यायामापेक्षा डायटकडे जास्त भर द्यावा लागला.’
किशोरवयातील जशा मुली असतात तशी उत्साही, अल्लड व खेळकर स्वभावाची बर्नी असते. काही करणास्तव तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळते. तिला अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागते. या संघर्षमय प्रवासात ती आणखीन प्रगल्भ बनत जाते आणि शेवटी खोट्या, दांभिक जगाशी सामना करत ती स्वतःचा आदर्श निर्माण करते, अशी बर्नीची भूमिका असल्याचे ती म्हणाली.
महिलांनी अन्याय, अत्याचार अजिबात सहन करायचा नाही. या अन्यायाला बळी न पडता त्यातून मार्ग काढला पाहिजे. तसेच धार्मिकतेपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे असा संदेश ‘बर्नी’ चित्रपटातून दिल्याचे तेजस्विनीने सांगितले. प्राध्यापक सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन ‘बर्नी’ चित्रपटाची कथा व पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली आहे. संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. या चित्रपटाची निर्मिती शिवम लोणारी यांची असून दिग्दर्शन नीलिमा लोणारी यांनी केले आहे. समीर आठल्ये यांचे छायादिग्दर्शन लाभले आहे. अमितराज यांनी गोव्यातील संस्कृतीशी अनुरूप चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाणी श्रीरंग गोडबोले यांच्या लेखणीतून साकार झाली आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांनी दिले आहे. उमेश जाधव यांनी नृत्य-दिग्दर्शन ; तर अनिल वात यांनी कला-दिग्दर्शन केले आहे.
कुंदन दिवेकर यांची रंगभूषा आणि वेशभूषा नीलिमा लोणारी व चैत्राली डोंगरे यांनी केले आहे. या चित्रपटात तेजस्विनी सोबत नीलकांती पाटेकर,राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.