१८ जूनला सादर होणार पहिला प्रयोग!
गुजराती रंगभूमीवर प्रचंड गाजलेले ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठीत पाहायला मिळणार असून, या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे होत आहे.
अनामिका व रसिका निर्मित आणि अमरदीप व साईसाक्षी प्रकाशित ‘कोडमंत्र’ या नाटकाची निर्मिती भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर व मुक्ता बर्वे करीत आहेत. या नाटकाच्या मूळ लेखिका स्नेहा देसाई या असून मराठीत रूपांतर विजय निकम यांनी केले आहे. दिग्दर्शन राजेश जोशी करीत आहेत. या नाटकात स्वत: मुक्ता बर्वे यांची लक्षवेधी भूमिका असून सोबत अजय पुरकर, उमेश जगताप, विक्रम गायकवाड, स्वाती बोवलेकर, अतुल महाजन, मिलिंद अधिकारी, कौस्तुभ दिवाण, अमित जांभेकर, संजय महाडिक, फैज खान, अजय कासुर्डे, संजय खापरे आणि अन्य २७ कलाकारांचा सहभाग आहे.
‘कोडमंत्र’ हे नाटक लष्कराच्या पार्श्वभूमीवर आधारित असून सीमेवर घडणार्या घटना व त्या संदर्भात घडणार्या गोष्टी या नाटकात आहेत. हे राष्ट्रीय एकात्मतेवरील नाटक असल्यामुळे मराठी भाषेतही तितकेच प्रभावशाली ठरेल या उद्देश्याने निर्माते भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर व मुक्ता बर्वे यांनी हे नाटक मराठीत आणले आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर, पार्श्वसंगीत सचिन जिगर, प्रकाशयोजना भौतेश व्यास, दिग्दर्शन सहाय्य सूरज व्यास, वेशभूषा अजय अरविंदभाई खत्री, सहनिर्माता अजय कासुर्डे तर प्रसिद्धी दीपक जाधव यांची आहे.