सिनेरसिक करताहेत १२ ऑगस्टची प्रतीक्षा
‘वायझेड’ या आगामी मराठी सिनेमाचा पहिलावहिला टीझर नुकताच लाँच झाला. नवे चेहरे, फ्रेश लूक आणि उत्सुकता वाढवणारं सादरीकरण यामुळे हा टीझर झपाट्याने ‘लाइक अँड शेअर’ होतोय. १२ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार असून, त्याची तीव्र प्रतीक्षा सिनेरसिकांना आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक खरं, जुनं व्हर्जन म्हणजेच ‘वायझेड व्हर्जन’ असतं असं म्हणत हा टीझर लाँच करण्यात आला आहे. क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस या लेखक- दिग्दर्शक जोडीचा तिसरा सिनेमा ‘वायझेड’ गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव आणि ‘’बिनधास्त सांगा मी वायझेड आहे’ या टॅगलाइनमुळे चर्चेत आहे.
काही दिवसांपर्वी सोशल मीडियावर सिनेमाच्या स्टारकास्टची ‘ओळख परेड’ करून देण्यात आली आणि तेव्हापासून हा सिनेमा नेमका कसा असेल याची उत्सुकता आणखी वाढली होती. सागर देशमुख, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका असून सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग यांनी केली आहे. ऋषिकेश- जसराज- सौरभ यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.
आकाशवाणी ऐकत स्वतःलाच गुदगुदल्या करून घेणारा एक मध्यमवयीन, काहीसा तर्कट वाटणारा गृहस्थ, नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, जाडजूड चष्मा आणि हातात चक्क बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज घातलेली तरुणी आणि हातात गुलाबाचं फूल घेऊन राजाच्या वेशात, उभा असलेला आणखी एक इसम आणि त्याच्याकडे पाहून लाजणारी ऋषीकन्येच्या वेशातली एक गोड मुलगी… असे वेगवेगळे तुकडे या टीझरमधून आपल्यासमोर येतात आणि हे नेमकं काय आहे असा विचार करत असतानाच सिनेमातल्या असंख्य क्षणाचा एक वेगवान कोलाज आपल्याला भारावून टाकतो.
सिनेमांच्या टीझरच्या नेहमीच्या मांडणीपेक्षा वेगळ्या सादरीकरणामुळे वायझेडचा हा पहिला टीझर लाँच सुपरहिट झाला आहेच, शिवाय टीझरच्या शेवटी ऐकायला मिळणाऱ्या ‘प्रत्येकाचं खरं, जुनं व्हर्जन, वायझेड व्हर्जन असतं’ या वाक्यामुळे ते मनात घर करून राहातं. हा सिनेमा १२ ऑगस्टला सिनेमागृहांत दाखल होतो आहे.